
Maharashtra Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता थांबेल. 17नोव्हेंबर रोजी रविवार आल्याने प्रचाराचा धुरळा उडालेला पाहायला मिळाला.

दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू मतदारसंघ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भागात मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगला, राज्यपालांचं राजभवन आणि ऐतिहासिक महत्त्व वास्तू असलेल्या मलबार हिल मतदारसंघातील लढत ही रंगतदार झालेली पाहायला मिळाली. भाजपने या मतदारसंघावर आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. मात्र यंदा शिवसेना(उबाठा) पक्षाने अॅडव्होकेट आणि सॉलिसिटर भेरूलाल चौधरी यांना मैदानात उतरवून भाजपचे मंगलप्रभात लोढा यांच्यासमोर कडवं आव्हान उभं केले आहे.
नक्की वाचा :मविआचं सरकार आल्यास बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार? सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
शिवसेना (उबाठा)ने या मतदारसंघात यंदा नवा चेहरा दिला आहे. चौधरी यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली होती. गिरगाव, अल्टामाऊंट रोड, खोताची वाडीसारख्या भागांत त्यांनी घरोघरी जात प्रचार केला. चौधरींच्या प्रचारासाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी सभा घेतली होती.

भाजपच्या मंगलप्रभात लोढांनी मलबार हिलमध्ये गेल्या काही वर्षांत केलेल्या विकासकामांवर भर देत स्वतःची मजबूत पकड निर्माण केली आहे. मात्र, पाणीपुरवठा, पार्किंग यासारखे मुद्दे अजूनही नागरिकांना सतावत आहेत. प्रचाराच्या शेवटच्या रविवारी मंगलप्रभात लोढा आणि भेरूलाल चौधरी या दोघांनीही प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता.

नक्की वाचा : 'माझ्या जागेवर दुसरीला आणलं', रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत ओक्साबोक्शी रडल्या...
बाळासाहेब ठाकरेंना वंदन करत प्रचार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 17 नोव्हेंबर हा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. शिवाजी पार्कातील त्यांच्या स्मृतिस्थळावर जात शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार भेरूलाल चौधरी यांनी त्यांना वंदन केले. यानंतर चौधरींची रविवारी बाईक रॅली निघाली होती तर मंगलप्रभात लोढा यांनीही एक रॅली काढली होती. यानंतर या दोन्ही उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला. मलबार हिलमधील लढत ही रंगतदार अवस्थेत पोहोचली असून इथे लोढा सातव्यांदा आमदार बनणार का भेरूलाल चौधरी त्यांचा विजयी वारू थांबवत जायंट किलर बनणार याची उत्सुकता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world