एकीकडे लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आहे. तर दुसरीकडे आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभेची मतमोजणी सुरू आहे. सुरूवातीच्या कलानुसार दोन्ही राज्यांत सत्ताबदल होईल अशी स्थिती दिसत आहे. आंध्र प्रदेश मध्ये वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डी यांची सत्ता जाताना दिसत आहे. तर ओडिशामध्ये नवीन पटनायक यांना धक्का देत भाजपने मुसंडी मारली आहे. मात्र ओडिशात कोणाचे सरकार होणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. इथे काँग्रेस सध्या किंग मेकरच्या भूमिकेत दिसत आहे.
हेही वाचा - Maharashtra Election Results 2024 Live : पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, चंद्रकांत खैरे, उदयनराजे भोसले पिछाडीवर
ओडिशा विधानसभेत भाजपची मुसंडी
ओडिशा विधानसभेच्या 147 जागांसाठी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी सध्या सुरू आहे. सुरूवातीच्या कलामध्ये भारतीय जनता पक्षाने ओडिशामध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. जवळपास 75 जागांवर त्यांनी आघाडी घेतली आहे. तर बिजू जनता दल 55 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसने 15 जगांवर आघाडी घेतली आहे. तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार पुढे आहेत. बहुमतासाठी 74 जागांची गरज आहे. सध्या भाजप त्या आकड्या पर्यंत पोहचला आहे. मात्र एक दोन जागा मागे पुढे झाल्यास ओडिशामध्ये पेच फसू शकतो. अशा वेळी काँग्रेस किंग मेकरची भूमीका बजावू शकतो अशी सध्याची स्थिती दिसून येत आहे.
हेही वाचा - Mumbai LIVE Election Results 2024 : भिवंडी मतदारसंघातून मविआचे सुरेश म्हात्रे आघाडीवर
आंध्र प्रदेशात चंद्राबाबूंची लाट
आंध्र प्रदेश विधानसभेच्या 175 जागांसाठी मतदान झाले होते. सुरूवातीचे कल पाहाता चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. जवळपास 133 जागांवर तेलगू देसम पार्टीने आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी वायएसआर काँग्रेसने केवळ 15 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर जननायक पार्टीला20 आणि भाजपला 07 जागांवर आघाडी आहे. काँग्रेसमात्र एकही जागा मिळवता आलेली नाही. मात्र इथे काँग्रेसने वायएसआर काँग्रेसचे मोठे नुकसान केल्याची चर्चा आहे. इथे सत्ता बदल होणार हे निश्चित समजले जात आहे. एनडीएसाठी ही एक दिलासा देणारी बाब म्हणावी लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world