Bhiwandi Mayor Election 2026 Result: भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत शुक्रवारी (20 फेब्रुवारी) हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण चौधरी यांनी पक्षाचा आदेश धाब्यावर बसवत बंडखोरी केली आणि काँग्रेसप्रणीत आघाडीच्या मदतीने महापौरपद काबीज केले. या राजकीय भूकंपानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. "ज्यांनी पक्षाचा व्हीप (Whip) डावलला आहे, त्या सर्वांविरोधात पक्ष कठोर कायदेशीर कारवाई करेल," असा इशारा त्यांनी दिला आहे.
भिवंडीच्या महापौर उमेदवारीबाबत काय झाली होती चर्चा?
रवींद्र चव्हाण म्हणाले की, भिवंडी महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीबाबत तीन-चार दिवस चर्चा सुरू होत्या. चर्चेमधून भिवंडी महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये निर्णय आणि निर्णय प्रक्रियेमध्ये काय करता येतंय, यासंदर्भात इथे असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून भाजपच्या माध्यमातून कोणी महापौरपदाच्या बाबतीमध्ये अर्ज भरावा? यावर निर्णय घेण्यात आला. सुरूवातीच्या काळात नारायण चौधरी यांनी अर्ज भरावा, असे पार्टीच्या माध्यमातून आठ ते दहा दिवसआधी कळवण्यात आलं होतं.
त्यांच्या कोअर टीमनंही नारायण चौधरींना महापौरपदाची उमेदवारी देण्यात य़ावी, असे बहुमताने आम्हाला कळवलं होतं. पण नंतर अनेक घडामोडी झाल्या तसेच घडामोडी घडत होत्या. त्यानंतर येथील भाजप प्रदेशाच्या स्तरावर हा विषय जेव्हा लक्षात आला, त्यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये स्नेहा मेहुल पाटील यांना भाजपच्या माध्यमातून उमेदवार म्हणून घोषित करावे, असे कळलं आणि आम्ही तसे कळवलंही. कारण काल पूर्ण संध्याकाळपासून, आज सकाळपर्यंत आम्ही नारायण चौधरी असतील किंवा त्यांच्यासोबतचे भाजप नगरसेवक बंडखोरी करतील असे लक्षात आल्यानंतर सर्वांना समजावण्याचा प्रयत्न केला.
(नक्की वाचा: Bhiwandi Mayor Election 2026: भिवंडी महापालिकेत सत्तापालट; भाजपचे बंडखोर नारायण चौधरी नवे महापौर)
बंडखोरांविरोधात कारवाई होणार: भाजप प्रदेशाध्यक्ष
रवींद्र चव्हाण पुढे असंही म्हणाले की, पार्टीविरोधात काम केलं तर पार्टी तुमच्याविरोधात कारवाई करेल. त्यांना समजावण्याचा अनेकजण प्रयत्न करत होते, आम्हीही करत होतो. या दिशेला जाऊ नका, असे आम्ही त्यांना समजावण्याचा फार टोकाचा प्रयत्न केला. बंडखोरी करणार नाही, असे ते सकाळपर्यंत म्हणाले होते, पण बंडखोरी केली. हे निकालाअंती लक्षात येलंय. त्यामुळे ज्यांनी-ज्यांनी पक्षाच्या व्हीपविरोधात काम केलंय किंवा मतदान केलंय, पक्ष त्यांच्याविरोधात कारवाई करणार आहे, असे आम्ही सर्वांनी मिळून ठरवलंय".
त्यांच्या (नारायण चौधरी) स्थानिक पातळीवरील घटना घडल्या होत्या ते आपण सर्वांना माहितीय. कोणार्क आघाडीचे प्रमुख असतील, त्यांचे असणारे स्थानिक वाद या सर्व गोष्टी ते वारंवार सांगत होते. यासाठीच आम्ही उमेदवार बदलला होता, कारण त्यांच्यामध्ये वाद आहेत. दुसऱ्या कोणालातरी उमेदवारी द्यावी म्हणूनच आम्ही स्नेहाताईंचा विचार केला. पण ज्यांनी कोणी बंडखोरी केलीय त्या सर्वांविरोधात आम्ही कारवाई करणार आहोत, असे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची संपूर्ण पत्रकार परिषद
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world