विधानसभा निवडणुकीची मतमोजणी काल पूर्ण झाली, सर्व निकालही हाती आलेत. अनेक नेत्यांचे जल्लोषही काही ना काही कारणास्तव चर्चेत ठरले आणि त्यातच सोशल मीडियात व्हायरल होणारी छगन भुजबळांची 'आर्मस्ट्राँग' पोझ खूप काही सांगून जाते आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची लढाई बनली होती.
नक्की वाचा - बीडमधील 6 मतदारसंघात नेमकं काय घडलं? महायुतीने लोकसभेतून कसा घेतला धडा?
लोकसभा निवडणुकीपासून जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक वादावादी सुरू होती. मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी या वादातून विधानसभेला भुजबळांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. कारण मतदानाच्या तीन दिवसांपूर्वी जरांगे पाटलांनी येवल्यात येऊन आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडण्याचे आवाहन केले होते. मात्र जरांगे फॅक्टर विधानसभेत फार चालला नाही. आणि छगन भुजबळसह मराठवाड्यातील अनेक नेते विजयी झाले.
त्यांच्यासमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माणिकराव शिंदे यांचे तगडे आव्हान होते, मराठा विरुद्ध ओबीसी असं या लढतीकडे बघितलं जात असतानाच मतदानाच्या तीनच दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांचा येवला तालुक्यात दौरा पार पडला होता. ज्यांनी ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा असं आवाहन त्यांनी केलं होतं.
नक्की वाचा - छत्रपती संभाजीनगर हादरलं; नेत्याच्या पराभवाने नाराज झालेल्या दोन कार्यकर्त्यांचं टोकाचं पाऊल
त्यामुळे एकंदरीतच छगन भुजबळांचं काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागलेल असतानाच छगन भुजबळ जवळपास 26 हजारांच्या लीडने विजयी झाले आणि विजय होताच त्यांनी आपल्या संपर्क कार्यालयाबाहेर जोरदार शक्ती प्रदर्शन केलं, आपली ताकद दाखवत त्यांनी एक पोझ देखील दिली. विशेष म्हणजे आपल्या भाषणात बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटलांचा नाव न घेता त्यांचा चांगलाच समाचार देखील घेतला.