महाविकास आघाडीकडून हा निकाल अनाकलनीय आणि अविश्वसनीय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. महायुतीचा 230 जागांवर विजय झाला आहे. कन्नड विधानसभा मतदारसंघात भाजप नेते रावसाहेब दानवे यांची कन्या संजना हर्षवर्धन जाधव यांनी शिंदे गटाकडून पती हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत संजना जाधव विजयी झाल्या आहेत. संजना यांचे पती हर्षवर्धन जाधव मनसेचे माजी आमदार (2009) आहेत. त्यांनी कन्नड विधानसभेतून अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र यात त्यांचा 18 हजार मतांनी पराभव झाला.
नक्की वाचा - कोणाला सर्वाधिक मताधिक्य तर कुठे 'नोटां'चा पाऊस; विधानसभा निकालातील Interesting गोष्टी
त्यांच्या पराभवाने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. आपल्या नेत्याचा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या नैराश्यातून दोन कार्यकर्त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. कन्नड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचा पराभव जिव्हारी लागल्याने त्यांच्या दोन समर्थकांनी विषारी द्रव प्राशन केले.
यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सुनील रामदास शिरसाठ व आनंद वसंत जाधव अशी त्यांची नावे आहेत. या दोघांवर रुग्णालयात उपचार केले जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world