सांगलीच्या जागेचा गुंता वाढला, काँग्रेसचा दावा कायम; मविआच्या अडचणी वाढल्या

चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय परस्पर जाहीर करण्यात आला. महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायला हवा होता असं विश्वजीत कदम म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins
सांगली:

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत जागावापट जाहीर केलं. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला सांगलीच्या जागेचा तिढाही यानिमीत्ताने संपुष्टात आला. सांगलीची जागा ही शिवसेनेकडे देण्यात येण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. ज्यामुळे महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील निवडणुकीचे उमेदवार ठरले आहेत. परंतु असं असलं तरीही काँग्रेस या जागेवरचा दावा सोडायला तयार नाहीये. ज्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

काँग्रेसकडून इच्छूक उमेदवार विशाल पाटील यांचे बंधू आणि माजी मंत्री प्रतिक पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. त्यातच काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनीही पत्रकार परिषद घेऊन सांगलीची जागा काँग्रेसला देण्याबाबत फेरविचार करण्यात यावा अशी विनंती केली.

जिल्ह्यात काँग्रेसं आणि समविचारी पक्षांचं वर्चस्व -

सांगली जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहून घेण्यात आलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा, अशी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना विनंती असल्याचं विश्वजीत कदम यांनी सांगितलं. ही माझी वयक्तिक नाही तर काँग्रेस पक्षाची भावना आहे. राज्य आणि देशातलं वातावरण नाकारण्याचा काहीच प्रश्न नसला तरीही सांगलीची जागा काँग्रेसला देण्याबाबत मविआच्या नेत्यांनी गांभीर्याने विचार करावा.

सांगलीची जागा लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. या जिल्ह्यात दोन आमदार हे काँग्रेसचे तर एक आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आहोत. स्थानिक जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतींमध्येही आमचे सदस्य मोठ्या प्रमाणात असून ही बाब आम्ही नेत्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो असं विश्वजीत कदम म्हणाले.

Advertisement

उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवारी जाहीर केली -

कोल्हापुरात शाहु छत्रपतींना पंजा चिन्हावर निवडणुक लढायची होती म्हणून ती जागा काँग्रेसला मिळाली. परंतु उद्धव ठाकरेंनी सांगलीत चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली, हा एकतर्फी निर्णय होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायला होता. उद्धव ठाकरेंबाबत आम्हाला आदर आहे, परंतु काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना समजून घेत हा निर्णय घेतला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

अवश्य वाचा - विशाल पाटील सांगलीत मविआचा खेळ बिघडवणार? बंधू प्रतिक पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला