काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेत आपलं जागावाटप जाहीर केलं. साहजिकच यामध्ये शिवसेना उबाठा पक्षाने बाजी मारत सर्वाधिक जागा आपल्या पदरात घेतल्या. गेल्या काही दिवसांपासून तिढा निर्माण झालेली सांगलीची जागाही अखेरीस शिवसेनेच्या पदरी पडली आहे. परंतु असं असलं तरीही काँग्रेसचे स्थानिक उमेदवार विशाल पाटील हे हार मानायला तयार नाहीयेत. आगामी लोकसभेसाठी आपली दावेदारी पक्की करण्याकरता विशाल पाटील हे वंचितच्या पाठींब्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशाल पाटील यांचे बंधू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांनी अकोला येथे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली.
वंचित विशाल पाटलांना उमेदवारी देण्यास तयार -
अकोला येथील प्रकाश आंबेडकरांचं निवासस्थान यशवंत भवन येथे प्रमुख नेत्यांची चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार या चर्चेत प्रकाश आंबेडकर यांनी विशाल पाटील यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. विशाल पाटील यांना वंचितची उमेदवारी द्यायची की पाठींबा द्यायचा याबद्दल नंतर निर्णय घेतला जाईल असं आंबेडकरांनी ठरवल्याचं कळतंय. विशाल पाटलांनी घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलेलं असून महाविकास आघाडीचं टेन्शन यामुळे वाढल्याचं बोललं जातंय.
सांगलीत आज विशाल पाटील यांच्या समर्थकांची बैठक होणार असून या बैठकीत आंबेडकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेता तपशील मांडला जाणार आहे. या चर्चेनंतर विशाल पाटील यांच्या उमेदवारीबद्दल अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.
जागावाटप जाहीर, सांगलीत काँग्रेस कार्यकर्ते नाराज -
महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन सांगलीची जागा ही शिवसेना उबाठा पक्षाकडे जाणार असल्याचं जाहीर केलं. सांगलीत शिवसेना उबाठा गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. परंतु महाविकास आघाडीच्या या निर्णयानंतर सांगली येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शन करत आपला निषेध व्यक्त केला. स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना या राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाला कळवण्यात येतील असंही स्थानिक काँग्रेस नेत्यांनी सांगितलं. काहीही झालं तरीही काँग्रेस सांगलीच्या जागेवरचा आपला दावा सोडणार नाही. विशाल पाटील यांनी जमिनीवर चांगलं काम करत निम्मा मतदारसंघ पालथा घातलेला आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्या उमेदवारीसाठी लढू असा निर्धार स्थानिक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
विशाल पाटलांसाठी काँग्रेस नेत्यांची बॅटींग व्यर्थ -
सांगलीची जागा महाविकास आघाडीला मिळाली यासाठी स्थानिक आमदार विश्वजीत कदम यांच्यापासून अन्य नेत्यांनी काँग्रेस हायकमांडची भेटही घेतली. परंतु ही चर्चा सुरु असतानाच शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. विश्वजीत कदम यांनी चंद्रहार पाटील यांना भविष्यात विधानपरिषदेवर घेऊ यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासनही दिलं. परंतु शिवसेनेने शेवटपर्यंत आपला दावा सोडला नाही. नाना पटोले, बाळासाहेब थोरात यासारख्या मोठ्या नेत्यांनीही शिवसेनेने सांगलीचा उमेदवार जाहीर केल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. परंतु सरतेशेवटी ही जागा शिवसेनेला सोडण्याचा निर्णय मविआने घेतला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world