काँग्रेसच्या आजी आणि माजी प्रदेशाध्यक्षांमध्ये सध्या चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोघांनी एकमेकांच्या आतल्या गोष्टी अगदी चव्हाट्यावर आणल्या आहेत. अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांच्यात ही शाब्दीक चकमक सुरू आहे. चव्हाणांनी आधी पटोलेंवर वार केला त्यानंतर पटोलेंनी चव्हाणांना जशाच तसे उत्तर देत त्यांची अंडी पिल्ली बाहेर काढू अशी थेट धमकीच देऊन टाकली.
हेही वाचा - मनसे महायुतीच्या या उमेदवारांचा प्रचार करणार नाही; शालिनी ठाकरेंचं ट्वीट
नाना पटोलेंचा चव्हाणांवर हल्लाबोल
अशोक चव्हाण यांची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही. त्यांचे अंडी पिल्ले बाहेर काढू असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे. शिवाय चव्हाण यांनी पक्षाचा स्वतःसाठी वापर केला असा आरोपही केला. त्यांनी राज्यात काय काय पाप केले त्याची जंत्री आपल्याकडे आहे असेही ते म्हणाले. बांधकाम विभागाचे मंत्री असताना त्यांचाकडे नोटा छापायची मशीन होती. ती आपणच बंद पडली, त्याचा त्रास अशोक चव्हाण यांना होत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली. शिवाय पक्षाच्याच लोकांना हरवण्याचे काम चव्हाण यांनी केल्याचा आरोपही त्यांनी केला.
अशोक चव्हाणांची टिका काय?
मंत्रीपद मिळावे यासाठी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार टीकलं असतं असे अशोक चव्हाण म्हणाले होते. एकंदरीत महाविकास आघाडीचे सरकार पडायला नाना पटोले यांचा राजीनामा कारणीभूत ठरल्याचे ते म्हणाले. शिवाय त्यावेळी सुरू असलेल्या चर्चांनाही चव्हाण यांनी दुजोरा दिला. पटोले यांना मंत्री व्हायचं होतं. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते असेही ते म्हणाले.
चव्हाण प्रत्युत्तर देणार?
दरम्यान अशोक चव्हाणांनी केलेल्या आरोपांना नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी थेट अशोक चव्हाणांची आपल्यावर बोलण्याची लायकी नाही असं वक्तव्य केले आहे. शिवाय त्यांचा काळाचिठ्ठा खोलू असेही म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असताना त्यांनी कसे पैसे कमवलेहेही नाना यांनी सांगून टाकले आहे. त्यामुळे या आरोपांना आता अशोक चव्हाण कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतात हे पहावं लागणार आहे. मात्र काँग्रेसच्या आजी माजी प्रदेशाध्यक्ष यांच्यात रंगलेल्या या वाकयुद्धामुळे सर्वांचेच मनोरंजन होत आहे हे मात्र नक्की. अशोक चव्हाण हे आता भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसनेही त्यांच्या विरोधातली टिकेची धार अजून तिव्र केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world