विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान सुरू आहे. महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी लढत या निवडणुकीत होत आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीकडून 9 तर महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानाला सकाळी सुरूवात झाली आहे. तेव्हा पासून काँग्रेसची मते फुटणार अशी विधानभवनात चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार अडचणीत आहे असा सुर विधान भवनात होता. मात्र या चर्चांवर काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुर्णविराम लावला आहे. शिवाय मते फुटणार की नाही हेच थेट पणे सांगितले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काँग्रेसची मते फुटणार का?
काँग्रेसने प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ पाहाता प्रज्ञा सातव या सहज विजयी होतील अशी स्थिती आहे. असे असतानाही काँग्रेसची तीन ते चार मते फुटतील अशी चर्चा होती. त्यात जितेश अंतापूरकर, जिशान सिद्धीकी यांची नावे ही घेतली जात होती. मात्र या सर्व चर्चांना विजय वडेट्टीवार यांनी पुर्ण विराम दिला आहे. काँग्रेसचे एकही मत फुटणार नाही. उलट काँग्रेसची मते वाढतील असा दावाही वडेट्टीवार यांनी केला. शिवाय जितेश अंतापूरकर आणि जिशान सिद्धीकी यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. त्यांनी काँग्रेसला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहितीही दिली. हे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर स्पष्ट होईल असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीचे तिनही उमेदवार जिंकतील असा दावाही त्यांनी यावेळी केला.
ट्रेंडिंग बातमी - काँग्रेसचे 4 आमदार फुटणार? काँग्रेसच्या नेत्यानेच नाव न घेता दिली माहिती
महायुतीचे आमदार फुटणार?
लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर महायुतीतील आमदारांमध्ये चलबिचल आहे. राज्यात सत्ताबदल होणार हे जवळपास निश्चित आहे असे वडेट्टीवार म्हणाले. याची कल्पना महायुतीच्या आमदारांना आहे. अनेकांची आमदारकी ही धोक्यात आहे. त्यामुळे अनेक आमदारा हे वेगळा विचार करत आहेत. त्यामुळे महायुतीचेच आमदार फुटतील असा दावाही वडेट्टीवार यांनी या निमित्ताने केला आहे. हे मतदानातून स्पष्ट होईल असेही वडेट्टीवार म्हणाले. असे असतानाही सत्ताधारी विरोधकांची आणि काँग्रेसची बदनामी करत आहेत. हे योग्य नाही असेही त्यांनी सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - विधानपरिषद निवडणूक : जागा 11, उमेदवार 12, कुणाचा होणार बकरा? वाचा संपूर्ण समीकरण
कोणाचा उमेदवार अडचणीत?
भाजपचे पाच, एकनाथ शिंदेंचे दोन, अजित पवारांचा आणि काँग्रेसचा एक उमेदवार सहज विजयी होवू शकतो. तेवढे संख्याबळ त्यांच्याकडे आहे. मात्र अकराव्या उमेदवाराच्या विजयासाठी रस्सीखेच आहे. त्यामुळे ही अकरावी जागा कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे मिलींद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यात रस्सीखेच आहे. या दोघां शिवाय शिवाजीराव गर्जे आणि भाजप पुरस्कृत सदाभाऊ खोत हे तर अडचणीत येणार नाहीत ना अशी ही चर्चा सध्या सुरू आहे.