जाहिरात

विधानपरिषद निवडणूक : जागा 11, उमेदवार 12, कुणाचा होणार बकरा? वाचा संपूर्ण समीकरण

Vidhanparishad Election 2024 : विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व राजकीय पक्षांना त्यांची शक्ती आजमवण्याची शेवटची संधी शुक्रवारी (12 जुलै) रोजी मिळणार आहे.

विधानपरिषद निवडणूक : जागा 11, उमेदवार 12, कुणाचा होणार बकरा? वाचा संपूर्ण समीकरण
Vidhanparishad Election 2024 : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत.
मुंबई:

विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व राजकीय पक्षांना त्यांची शक्ती आजमवण्याची शेवटची संधी शुक्रवारी (12 जुलै) रोजी मिळणार आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी निवडणूक आणि लगेच मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे एकाचा पराभव नक्की आहे. महायुती आणि महाविकास आघाडीनं आपल्या उमेदवाराचा बकरा होऊ नये म्हणून जय्यत तयारी केलीय. दोन्ही आघाड्यांनी विजयाचे दावे केलेत. त्याचबरोबर खरबरदारीचा उपाय म्हणून राजकीय पक्षांनी आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवलं आहे. मतांची फाटाफुट टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात येतीय.

महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला

लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीनं मोठं यश मिळवलं.  काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार-शिवसेना उद्धव ठाकरे या 3 पक्षाच्या आघाडीला 48 पैकी 31 जागा मिळाल्या. तर भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या सत्तारुढ महायुतीला 17 जागांवरच समाधान मानावं लागलं.

या निकालामुळे आत्मविश्वास वाढलेल्या मविआनं एक अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवलाय. या निवडणुकीत आमदार फोडण्यासाठी कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय. 

( नक्की वाचा :  विधानपरिषद निवडणूक : आमदार फोडण्यासाठी कोट्यवधींची ऑफर, जयंत पाटील यांनी रेट सांगितला )

कोणते उमेदवार रिंगणात?

विधान परिषद निवडणुकीतील 11 जागांसाठी महायुतीचे 9 आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार असे एकूण 12 उमेदवार रिंगणात आहे.  

भाजपाचे उमेदवार
पंकजा मुंडे
परिणय फुके
अमित बोरखे
योगेश टिळेकर
सदाभाऊ खोत

शिवसेना (एकनाथ शिंदे )
भावना गवळी
कृपाल तुमणे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
राजेश विटेकर
शिवाजीराव गर्जे

काँग्रेस
डॉ. प्रज्ञा राजीव सातव

शेतकरी कामगार पक्ष
जयंत पाटील

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मिलिंद नार्वेकर

काय आहे मॅजिक फिगर?

विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या भागिले विधानपरिषदेतील रिक्त जागांची संख्या अधिक 1 या पद्धतीनं कोटा ठरतो. राज्य विधानसभेच्या एकूण जागा 288 आहेत. पण, लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या काही आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आता हे संख्याबळ 274 वर आलं आहे.

विधानसभेच्या एकूण जागा 274 जागांचा रिक्त जागा 11 +1 म्हणजेच 12 ने भागाकार केला तर 22.833 हे उत्तर येतं. त्यामुळे विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे 23 ही या निवडणुकीतील मॅजिक फिगर आहे.

( नक्की वाचा : पंकजा मुंडे विधानपरिषदेवर, भाजपाकडून 5 जणांना उमेदवारी जाहीर )


महायुतीचं संख्याबळ काय?

महायुतीमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपाचे 103 आमदार असून अपक्ष आणि मित्रपक्ष मिळून भाजपाचे 111 आमदार आहेत.  भाजपानं 5 जणांना उमेदवारी दिली असून सध्याचं संख्याबळ पाहात हे सर्व उमेदवार निवडून येतील असं मानलं जातंय.

शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे 38 आमदार आहेत. त्यांना 7 अपक्ष आणि बच्चू कडू यांच्या पक्षाच्या 2 अशा 9 आमदारांचा पाठिंबा आहे. शिवसेनेचं संख्याबळ 47 आहे. या संख्याबळाच्या जोरावर काही धक्कादायक निकाल लागला नाही तर त्यांचे 2 उमेदवार विजयी होऊ शकतात.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे 39 आमदार आहेत. राष्ट्रवादीनंही 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादीला दोन्ही जागा जिंकण्यासाठी आणखी 7 आमदारांची गरज आहे.

महाविकास आघाडीचं संख्याबळ

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेसचे 37 आमदार आहेत. या संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसचा एक उमेदवार नक्की विजयी होईल. त्यानंतर काँग्रेसकडं 14 मतं शिल्लक राहतील.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे 13 आमदार आहेत. तर शेकापचा 1 आमदार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1 उमेदवार रिंगणात असून त्यांचे 15 आमदार आहेत. 

महायुतीचे एकूण 202, महाविकास आघाडीचे 66 आमदार आहेत. 6 आमदार तटस्थ आहेत. त्यामध्ये  एमआयएम - 2, समाजवादी पार्टी - 2, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी -1 आणि क्रांतीकारी शेतकरी पक्ष- 1 असे 6 आमदार तटस्थ आहेत. हे आमदार या कुणाला मतदान करणार यावरही निवडणुकीचं चित्रं अवलंबून असेल.

 नक्की वाचा : विधानपरिषद निवडणूक : महायुतीची मतं फोडण्यासाठी पवार रिंगणात, मोठा नेता गळाला लागणार? 

शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता

विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत 23 मतांचा कोटा पूर्ण केलेले उमेदवार पहिल्याच फेरीत विजयी होतील. त्यानंतर दुसऱ्या आणि गरज पडली तर तिसऱ्या पसंतीची मतं मोजली जातील. त्यामुळे आमदार त्यांची दुसरी आणि तिसरी पसंत कुणाला देतात हे देखील महत्त्वाचं असेल. विधानपरिषद निवडणुकीच्या आजवरच्या इतिहासात अनेकदा धक्कादायक निकाल लागले आहेत. ही निवडणूक देखील त्याला अपवाद ठरण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कोणते 11 उमेदवार विजयी होणार? पराभूत होणारा उमेदवार कोण असेल? हे अगदी शेवटच्या क्षणी समजेल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
विधानपरिषद निवडणूक : आमदार फोडण्यासाठी कोट्यवधींची ऑफर, जयंत पाटील यांनी रेट सांगितला
विधानपरिषद निवडणूक : जागा 11, उमेदवार 12, कुणाचा होणार बकरा? वाचा संपूर्ण समीकरण
Live Update maharashtra Legislative Council election Voting for 11 seats will begin shortly
Next Article
Vidhan Parishad Election result Update : महायुतीची सरशी, मविआला धक्का!