Dhananjay Munde Exclusive : बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचार रोज नवं वळण घेतोय. बारामतीमध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी लढत होतीय. नणंद-भावजयीमध्ये होणारी ही लढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेची बनलीय. सुनेत्रा पवार या बाहेरच्या असल्याचे संकेत शरद पवार यांनी यापूर्वी दिले होते. त्यावर मोठा गदारोळ झालाय. राज्याचे कृषीमंत्री आणि अजित पवारांचे विश्वासू सहकारी धनंजय मुंडे यांनी NDTV मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये पवार कुटुंबीयांवर गंभीर आरोप केला आहे.
अजित पवारांना कुटुंबाने एकटे पाडले असा आरोप मुंडे यांनी 'NDTV मराठी' दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. शरद पवारांनी कुठं सभा घ्यावी हा त्यांचा निर्णय आहे. आधा ते देशात, राज्यात प्रचार करत. आता त्यांच्यावर बारामतीमध्ये लक्ष देण्याची वेळ आली आहे, असा टोला मुंडे यांनी यावेळी लगावला.
( नक्की वाचा : 'सुनेत्रा पवार बाहेरच्या नाही, तर बारामतीकरांच्या मनामनातील सूनबाई')
सर्व कुटुंब एक व्हायचे आणि अजित पवारांना एकटं पाडायचे. बारामतीमध्ये विकासकामं अजितदादांनी केले आहेत, हे सर्वांना माहिती आहे. त्यांच्या विरोधात सर्व पवार कुटुंब एकत्र आले आहे. पण, अजित पवारांनी बारामतीचा विकास केला असल्यानं जनता पाठिशी राहील. बारामतीमध्ये सहानुभूती कुणाच्या बाजूनं आहे, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल असा टोला मुंडे यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.
बीडमध्ये पंकजा विजयी होणार
बीडमध्ये जातीय तेढ मुद्दाम निर्माण केली. काहीजण जातीय तेढ निर्माण करतात पण मतामध्ये परिवर्तन होत नाही, हा इतिहास आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे विजयी होणार. किती मतांनी जिंकणार हे त्यादिवशी सांगतो, असं मुंडे यांनी स्पष्ट केलं. मराठवाडा, राज्यात तसंच देशात एनडीए सरकारचं वातावरण आहे. आम्ही प्रचाराला जातो तेंव्हा हे जाणवतं. मोदींना परत आणायचं आहे, हे जनतेनं ठरवलंय. महाविकास आघाडीनं जातीय तेढ निर्माण करण्याचं काम केलंय, असं मुंडे यांनी सांगितलं.