सुनेत्रा पवार या बाहेरच्या नाही, तर बारामतीकरांच्या मनामनातील सूनबाई आहेत, असं वक्तव्य करत सूनबाई दिल्ली जाणारचं असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी महायुतीची जाहीर सभा झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रामदास आठवले यावेळी उपस्थित होते.
फडणवीसांचा शरद पवारांना टोला
शरद पवारांनी सुनेत्रा पवारांचा उल्लेख बाहेरची असा केला होता. त्याचा समाचार देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. सुनेत्रा पवार या बाहेरच्या नाही, तर बारामतीकरांच्या मनामनातील सूनबाई आहेत. बारामतीचा फैसला आजच्या सभेनेच केला आहे. मागिल निवडणुकीत जे दोन नंबर, तीन नंबरला होते, ते सर्व आज या मंचावर एकत्र आहे. आताच ही 12 लाख मतं होतात. त्यामुळे सूनबाईच दिल्लीला जातील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. ही लढाई पवारसाहेब विरूद्ध दादा अशी, किंवा सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार नाही. या निवडणुकीत केवळ इतकंच पाहायचंय की बारामतीचा खासदार मोदींच्या बाजूने उभा राहातो की राहुल गांधींच्या बाजूने. त्यामुळे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे असेही फडणवीस म्हणाले.
'अब की बार सुनेत्राताई पवार'
फडणवीसांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जोरदार बॅटींग केली. त्यांनी यावेळी 'अब की बार सुनेत्राताई पवार' अशीच घोषणा देवून टाकली. आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, ती बरोबर फिरवा असं आवाहन शिंदे यांनी यावेळी केलं. शिवाय त्यांनी शरद पवारांना डिवचण्याची संधीही सोडली नाही. ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटतं त्यांना मनात मांडे खाऊ द्या, कारण ज्यांच्या मनात मांडे त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाहीत असा हल्लोबोलही त्यांनी केला.
सुनेत्रा पवारांवरील टिकेला अजित पवारांचे उत्तर
सुनेत्रा पवार नवख्या असल्याचा त्यांच्यावर आरोप होतो. या आरोपाला अजित पवारांनी सडेतोड उत्तर दिले आहे. कोणीही आईच्या पोटातून शिकून येत नाही. मीही 1991 ला नवखा होता. त्यानंतर राजकारणात स्थिरावलो. त्यामुळे सुनेत्रा पवारही त्याच प्रमाणे मार्गक्रम करतील असे ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world