लोकसभा निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. त्यात आता ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकमेकांवर तुटून पडताना दिसत आहे. नेत्यांची बोचरी वक्तव्य राजकारणाची पातळी कुठे गेली आहे याचा विचार करायला लावत आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी असेच एक वक्तव्य केले आहे. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही जशाच तसे उत्तर दिले आहे. त्यामुळे ठाकरे विरूद्ध शिंदे असे वाकयुद्ध सध्या रंगताना दिसत आहे.
हेही वाचा - दिर की भावजय ? अटीतटीच्या लढतीत धाराशिवचा खासदार कोण होणार?
‘बाप 1 नंबरी आणि बेटा 10 नंबरी'
उबाठामध्ये ‘बाप 1 नंबरी आणि बेटा 10 नंबरी'आहेत. आदित्य ठाकरेने माझा 'नीच' म्हणून उल्लेख केला. एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला, हे त्यांना सहन झालेले नाही. त्यांनी माझा नाही तर गोरगरिब, शेतकरी माता भगिनी आणि माझ्या समाजाचा अपमान केला आहे. असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख निच असा केला होता. त्याला शिंदे यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.
आदित्य ठाकरेंकडून निच असा उल्लेख
आदित्य ठाकरे यांनी त्या आधी शिंदेंना लक्ष्य केले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा उल्लेख निच असा केला. ज्यावेळी उद्धव ठाकरेंना आधाराची गरज होती त्याच वेळी या माणसाने पाठीत खंजिर खुपसला. असा निर्लज आणि निच व्यक्ती आपण पाहिली नाही असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले होते. शिवाय शिंदेंचे पैशाचे गोडाऊनही सापडले होते. त्यावेळी अटक की नोट अशी अट भाजपने टाकली होती असा गौप्यस्फोटही आदित्य यांनी केला होता. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पाडले गेले असेही ते म्हणाले.
ठाकरे पण प्रतिहल्ला करणार?
शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा उल्लेख एक नंबरी आणि दस नंबरी केला आहे. त्याला आता ठाकरे गटाकडून काय उत्तर येते हे पहावे लागेल. मात्र गेल्या काही दिवसापासून ठाकरे गट शिंदें विरूद्ध भलताच आक्रमक झालेला दिसतो. शिवाय शिंदेंना जागा वाटपात भाजपने कसे गंडवले हेही ते प्रचारामध्ये सांगत आहेत. अशा वेळी ठाकरेंकडून निच असा उल्लेख केल्यानंतर शिंदेंनी लगेचच भावनिक होत ट्विट केले आहे.