जाहिरात
This Article is From Apr 24, 2024

दिर की भावजय ? अटीतटीच्या लढतीत धाराशिवचा खासदार कोण होणार?

दिर की भावजय ?  अटीतटीच्या लढतीत धाराशिवचा खासदार कोण होणार?
धाराशिव:

धाराशिव लोकसभा मतदार संघात यावेळी अटीतटीची लढत होत आहे. शिवाय या लढतीला कौटुंबिक वादाची किनारही आहे. या मतदार संघात दिरा विरोधात भावजय मैदानात उतरली आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने धाराशिवमधून ओमराजे निंबळाकर यांना उमेदवारी दिली आहे तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने अर्चना पाटील यांना रिंगणात उतरवलं आहे. अर्चना पाटील यांनी ऐन वेळी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी मिळवली आहे. अर्चना पाटील या ओमराजे निंबाळकर यांच्या भावजय लागतात. त्यामुळे दिर विरूद्ध भावजय असा सामाना या मतदार संघात रंगतोय.

हेही वाचा - दुसऱ्या टप्प्यातील प्रचार थंडावणार, दिग्गजांच्या सभांनी आजचा दिवस गाजणार

ठाकरेंनी दिली ओमराजेंना संधी 

शिवसेनेत फुट पडल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली. त्यामुळे ठाकरे यांनी ओमराजे यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार रविंद्र गायकवाड यांची उमेदवारी कट करून ओमराजेंना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ओमराजेंचे बंधू राणाजगजितसिंह पाटील यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा एक लाखा पेक्षाही जास्त मतांनी पराभव झाला होता. पुढे राजकीय घडामोडीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पुढे ते तुळजापूर विधानसभा मतदार संघातून भाजपकडून निवडूनही आले. ओमराजे निंबळाळकर आणि राणाजगजितसिंह यांच्या कौटुंबिक वाद आहेत. 

राष्ट्रवादीने दिली अर्चना पाटील यांना उमेदवारी 


धाराशिव मतदार संघ मिळावा यासाठी महायुतीत रस्सीखेच होती. शेवट पर्यंत निर्णय होत नव्हता. या मतदार संघावर भाजप, शिंदे गट आणि अजित पवार यांनी दावा केला होता. मात्र शेवटच्या क्षणी भाजपचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसला आयात करावा लागला. भाजपच्या अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अर्चना पाटील या राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. प्रवेश केल्यानंतर त्यांना लगेचच उमेदवारीही देण्यात आली. या मतदार संघातून अर्चना पाटील यांचे सासरे पद्मसिंह पाटील हेही खासदार राहीले आहेत. मात्र 2014 च्या निवडणुकीत त्यांना पराभव सहन करावा लागला होता. त्याच्या पुढच्या निवडणुकीत 2019 मध्ये पती राणाजगजितसिंह पाटील यांनाही पराभव सहन करावा लागला होता. सासरे आणि पतीच्या झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी अर्चना पाटील तयार आहेत. त्यांच्या मागे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद आहे. त्यामुळे त्या ओमराजेंना जोरदार टक्कर देतील अशी स्थिती आहे.   

मतदार संघात कोणाची किती ताकद? 

धाराशिव लोकसभेत सहा विधानसभा मतदार संघ येतात. त्यातील लातूर जिल्ह्यातील औसा, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. तर धाराशिव मधिल उमरगा, परांडा, धाराशिव आणि तुळजापूर या चार विधानसभा मतदार संघाचा समावेश होता. सहा पैकी दोन ठिकाणी भाजप आमदार, दोन ठिकाणी शिंदे शिवसेना, एक ठिकाणी ठाकरे गट आणि एका मतदार संघात अपक्ष आमदार निवडून आला आहे. अपक्ष आमदाराने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सध्याच्या स्थिती महायुतीची स्थिती या मतदार संघात भक्कम दिसत आहे. 

विधानसभा मतदार संघ        आमदार                 पक्ष 

औसा                               अभिमन्यू पवार         भाजप 
उमरगा                             ज्ञानराज चौघुले        शिवसेना ( शिंदे ) 
तुळजापूर                          राणाजगजितसिंह      भाजप
उस्मानाबाद                       कैलास पाटील          शिवसेना ( ठाकरे ) 
परांडा                               तानाजी सावंत          शिवसेना ( शिंदे ) 
बार्शी                                 राजेंद्रे राऊत            अपक्ष 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com