निवडणूक आयोगाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना नोटीस पाठवली आहे. या दोघांना 18 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजेपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींवरून दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना नोटीस पाठवण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला आहे. 22 मे 2024 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्तांनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या स्टार प्रचारकांना काबूत ठेवावे आणि सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश दिलेले होते. या निर्देशांची आठवणही आयोगाने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना पाठवलेल्या नोटीसद्वारे करून देण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राहुल गांधींची विधाने ही निखासल खोटी, भाजपचा आरोप
भाजपला संविधान नष्ट करायचे आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले होते, यावर भाजपने आक्षेप घेतला होता. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील एका सभेमध्ये भाजपवर टीका करताना संघ आणि भाजपला संविधान नष्ट करायचे आहे असा आरोप केला होता. राहुल गांधी यांनी म्हटले होते की तुम्ही भारतातील विद्यापीठांच्या कुलगुरुंची यादी पाहिलीत तर त्यांच्यात कुठलेच मेरीट नसल्याचे दिसून येते. संघाशी निगडीत असणे हाच त्यांच्या निवडीचा आधार होता. तुम्हाला कुलगुरू बनायचे असेल तर तुम्ही संघाचे सदस्यत्व स्वीकारा. तसे केल्यास तुम्हा इतिहास, भूगोल विज्ञान सोडाच काहीही माहिती नसेल तरीही तुमची कुलगुरूपदी निवड होईल. असे एका विद्यापीठासोबत होत नाहीये तर देशातील सगळ्याच विद्यापीठांमध्ये असे होत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते.
नक्की वाचा : 'नाना पटोलेंनी आमची संधी नाकारली, त्यांना जागा दाखवू', आंबेडकरी चळवळीतील नेत्यांचा इशारा
भाजपने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अॅपल कंपनीचा iPhone आणि बोईंग विमाने ही इतर राज्यांत महाराष्ट्राच्या पैशांतून तयार केली जात आहे. राहुल गांधी हे तरुणांची माथी भडकावण्याचेही काम करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. राहुल गांधींची भाषणे ही खोटारडेपणावर आधारीत असून ही भाषणे भारताच्या एकसंधतेला बाधा निर्माण करणारी आणि समाजात तेढ निर्माण करणारी असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.
काँग्रेसचीही भाजपविरोधात तक्रार
काँग्रेसनेही भाजपविरोधात तक्रार केली आहे. 12 नोव्हेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी धनबाद येथे एक भाषण केले होते. या भाषणात त्यांनी काँग्रेसवर टीका केली होती. या भाषणात त्यांनी खोटी आणि समाजात तेढ निर्माण केलेली विधाने केल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेस ही अनुसूचित जाती, जमातींच्या विरोधात असल्याचा आरोप काँग्रेसने शाह यांच्यावर केला. काँग्रेस एससी,एसटी, ओबीसींचे आरक्षण हिरावून घेणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही शाह यांनी केला होता. काँग्रेसने तक्रारीत म्हटले आहे की, शाह यांनी मतदारांची माथी धर्म आणि जातींच्या आधारे भडकावण्याचा प्रयत्न केला आहे आणि भाजप समाजात जातीय तेढ निर्माण करत आहे.