काँग्रेस नेते राहुल गांधी नेहमीच कोणत्या न कोणत्या विषयामुळे चर्चेत असतात. आता ते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. तमिळनाडूमधील प्रचार संपवून सध्या ते केरळमध्ये आहेत. केरळ निवडणुकीच्या प्रचारात मग्न असताना त्यांच्याबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तामिळनाडूतील निलगिरी येथील निवडणूक अधिकाऱ्यांनी सोमवारी राहुल गांधी यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. हेलिकॉप्टर येथे उतरल्यानंतर उड्डाण पथकाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा शोध घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
राहुल केरळमधील वायनाड या संसदीय मतदारसंघात एका जाहीर सभेला संबोधित करण्यासह अनेक निवडणूक प्रचार कार्यात भाग घेणार आहेत. यावेळा ही फ्लाइंग स्क्वॉडच्या अधिकाऱ्यांकडून ही झाडाझडती करण्यात आली. सदर तपासाबाबतचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. ते सलग दुसऱ्यांदा वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. वायनाड येथे 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
राहुल गांधी यांनी वायनाड येथील निलगिरी महाविद्यालयात कला आणि विज्ञाना क्षेत्रातील विद्यार्थींचे आणि चहाच्या बागेतील कामगारांची भेट घेतली. वायनाडमध्ये पोहोचताच त्यांनी रोड शो केला. रोड शो दरम्यान ते म्हणाले की, 'वायनाडच्या लोकांनी मला जे प्रेम आणि आपुलकी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. वायनाडमधील प्रत्येक व्यक्ती माझे कुटुंब आहे.'
कोण आहेत राहुल गांधींच्या प्रतिस्पर्धी ॲनी राजा?
राहूल गांधी यांच्या विरोधात सीपीआयने ॲनी राजा यांना तिकीट दिले आहे. वायनाड मतदारसंघातील सीपीआय पक्षाची उमेदवार पक्षाचे सरचिटणीस डी राजा यांची पत्नी ॲनी राजा आहे. सध्या त्या नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमनच्या सरचिटणीस आहेत. याशिवाय तिरुअनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या विरोधात पनियान रवींद्रन यांना तिकीट देण्यात आले आहे. तर व्हीएस सुनील कुमार यांना त्रिशूरमधून आणि अरुण कुमार यांना मावेलिकारामधून उमेदवारी देण्यात आली आहे. सीपीआयने केरळमधील काँग्रेसच्या दोन दिग्गज खासदारांविरुद्ध पक्षाचे उमेदवार घोषित केले आहेत.