विधानसभा निवडणुकीचे सुरूवातीचे कल लक्षात घेता महायुतीला बंपर विजय मिळत असल्याचे दिसत आहे. सुरूवातीचे कल पाहीले असता महायुतीला 220 जागांवर आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 57 जागांवर आघाडी आहे. कल फारसे बदलताना दिसत नाहीत. त्यामुळे महायुतीचे सरकार होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यात आता मुख्यमंत्री कोणाचा याची चर्चा महायुतीत सुरू झाली आहे. महायुतीत भाजपच्या जागा जास्त आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असं भाजप नेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे. सध्याच्या स्थितीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महायुतीला महाराष्ट्रात बंपर यश मिळताना दिसत आहे. सुरूवातीला अटीतटीची वाटणारी ही लढत अगदीच एकतर्फी झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. एक प्रकारे महायुतीने महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे. भाजप राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला असून सध्या 130 जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे 54 उमेदवार आघाडीवर आहे. अजित पवारांचे 34 उमेदवार आघाडीवर आहेत. महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसचं पुढचे मुख्यमंत्री होणार असं मानलं जात आहे.
मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी धर्मयुद्ध पुकारले होते. त्याला जनतेने प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहीजे. देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री व्हायला पाहीजेत असं मत भाजप नेते प्रविण दरेवकर यांनी व्यक्त केले आहे. ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री असंही ते म्हणाले. मात्र याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असंही त्यांनी सांगितलं. महायुतीच्या विजयात फडणवीसांचा वाटा मोठा आहे असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान एकीकडे फडणवीसांचे नाव आघाडीवर असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानेही मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली होती. ते सर्वांनी मान्यही केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री तेच व्हावेत अशी आपली इच्छा आहे असं शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. शिवाय तेच मुख्यमंत्री होतील असं ही त्यांनी सांगितला. पण भाजपा मिळालेलं यश पाहाता त्यांचा मुख्यमंत्रिपदावरचा दावा किती ग्राह्य धरला जाईल याबाबत शंका आहे.