लोकसभा निवडणुकीत 293 जागांवर विजय मिळवणारी NDA सत्तास्थापनेसाठी तयार झाली आहे. लोकसभा निकालाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी, 5 जूनला नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू दिल्लीला रवाना झाले आहेत. एनडीएच्या नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत तेलुगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू आणि जनता दलाचे नितीश कुमार यांच्यासह सर्व घटकपक्षांच्या नेत्यांनी एनडीएला समर्थन देत असल्याचं पत्र सादर केलं. त्यामुळे इंडिया आघाडीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी जुळवाजुळव सुरू असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचं म्हटलं जात असताना इंडिया आघाडीच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
इंडिया आघाडीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्विट करण्यात आलं आहे. यात 'गेम नॉट ओव्ह, वेट' असं म्हटलं आहे. या ट्विटनंतर पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे. गुरुवारी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी नेमकी काय चर्चा झाली याबाबत काहीच माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र गुरुवारी रात्री इंडिया आघाडीच्या अधिकृत ट्विटरवरून केलेल्या ट्विटवरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इंडिया आघाडी काय नवा डाव टाकणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.