जाहिरात

इंदापूरची जागा वाढवणार महायुतीची डोकेदुखी, पवार-फडणवीस कसा सोडवणार तिढा?

Indapur Vidhan Sabha Election : पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभेची जागा महायुतीसाठी डोकेदुखी बनलीय. 

इंदापूरची जागा वाढवणार महायुतीची डोकेदुखी, पवार-फडणवीस कसा सोडवणार तिढा?
इंदापूर:


देवा राखुंडे, प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटामध्ये प्रत्येकी 3 पक्ष आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघात जागावाटपाचा पेच निर्माण होणार आहे.  पुणे जिल्ह्यातील इंदापूरची जागा महायुतीसाठी डोकेदुखी बनलीय. 

इंदापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपा नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे दोन नेते निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. मागील दोन विधानसभा निवडणुकीत भरणे  विरुद्ध पाटील अशी थेट लढत झाली. दत्तात्रय भरणे या दोन्ही निवडणुकीत विजयी झाले. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी हर्षवर्धन पाटील तयारीला लागले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

5 वर्षांनी तोच पेच

2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी इंदापूरची जागा प्रतिष्ठेची केली होती. वाट्टेल ते झाले तरी चालेल पण इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडणार नाही…भले आघाडी नाही झाली तरी बेहत्तर!, असं पवार यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर हर्षवर्धन पाटील काँग्रेसमधून बाहेर पडले आणि भाजपामध्ये दाखल झाले. पण, गेल्या पाच वर्षात राज्यातील राजकारणात मोठा बदल झालाय. अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह महायुतीमध्ये दाखल झाले आहेत. या आमदारांमध्ये दत्तात्रय भरणे यांचाही समावेश आहे. त्यामुळे 5 वर्षांनी पुन्हा एकदा इंदापूरसाठी पाटील आणि भरणे आमने-सामने आले आहेत. 

( नक्की वाचा : 'गरज सरो, वैद्य मरो!' प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंवर का भडकले? )
 

लोकसभा निवडणुकीत मनोमिलन

यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचं मनोमिलन झालं. देवेंद्र फडणवीसांसोबत जी चर्चा झाली त्या शब्दाची पूर्तता केली जाईल, असं सांगत अजित पवार यांनी नरमाईची भूमिका घेतली.  तर देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरात संवाद मेळावा घेत तुमच्या मनात जे आहे ते कृतीत उरवेल असा जाहीर शब्द इंदापूरच्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे भाजपा ही जागा लढवणार अशी चर्चा सुरु झाली आहे. 

दत्तात्रय भरणे आणि हर्षनवर्धन पाटील हे दोन्ही नेते याबाबत फडणवीस आणि पवार यांचा निर्णय अंतिम असल्याचं सागंत आहेत. त्यांच्या सावध भूमिकेमुळे इंदापूरची जागा कोण लढवणार? हा सस्पेन्स आणखी वाढलाय. 

( नक्की वाचा : 'त्यांचा खरा चेहरा वेगळा...तोडपाणी, वसुलीत...' रवी राणांचे बच्चू कडूंवर गंभीर आरोप )
 

तिरंगी लढत होणार?

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रीया सुळे विजयी झाल्या. त्यांना इंदापूर मतदारसंघातही मताधिक्य मिळालं होतं. या विजयानंतर शरद पवार यांनी इंदापूरच्या शेतकऱ्यांशी बोलताना 'मला चार-सहा महिन्यात सरकार बदलायचं आहे,' असं मोठं वक्तव्य केलं होते. महायुतीमधील तिढ्याकडं शरद पवारांचं लक्ष असणार यात शंका नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत इंदापूरमध्ये तिरंगी लढत देखील होऊ शकते. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com