पालघर लोकसभेसाठी महायुतीकडून उमेदवार कोण असणार हे अजूनही निश्चित नाही. तर महाविकास आघाडीनं भारती कामडी यांना मैदानात उतरवलं आहे. तर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनं पालघर लोकसभा लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. अशातच आता जिजाऊ संघटनेनं आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे सुरूवातीला तिरंगी वाटणारी ही लढत आता चौरंगी होणार आहे. त्यामुळे पालघर लोकसभेची लढत आता चांगलीच रंगतदार होणार हे निश्चित.
जिजाऊ संघटनेचा उमेदवार मैदानात
निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेनं पालघरसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. कल्पेश भावर यांची उमेदवारी सांबरे यांनी जाहीर केली. बोईसर येथे झालेल्या मेळाव्यात त्याची घोषणा करण्यात आली. कल्पेश भावर हे उच्च शिक्षित आहेत. पालघरच्या जनतेला परिवर्तन पाहिजे असेल तर एक वेळ विश्वास ठेऊन कल्पेश भावर यांना खासदार म्हणून निवडून द्या असं आवाहन यावेळी सांबरे यांनी केलय. पुढील ५ वर्षात पालघर जिल्ह्याचा कायापालट करून दाखवेन हा माझा शब्द आहे असंही ते म्हणाले. दरम्यान निलेश सांबरे हे भिवंडीतून काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक होते. पण ही जागा राष्ट्रवादीला गेल्याने त्यांची निराशा झाली. त्यामुळे त्यांनी त्यांच्या संघटनेचाच उमेदवार आता रिंगणात उतरवला आहे.
महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर
पालघर लोकसभेची जागा महाआघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडे गेली आहे. ठाकरे गटाने भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भारती कामडी या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आहेत. ठाकरेंनी त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना मैदानात उतरवलं आहे. कामडी या दोन वेळा जिल्हा परिषदेवर निवडूनही गेल्या आहेत. महिला जिल्हा संघटक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.
महायुतीचा उमेदवार ठरेना
महायुतीत ही जागा कोण लढवणार यावर अजूनही एकमत झालेले नाही. भाजपने या जागेवर दावा केला आहे. विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिवसेना शिंदे गटात आहेत. मात्र ते भाजपमधूनच शिवसेनेत गेले होते. त्यामुळे गावित यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढावी असा भाजपचा आग्रह आहे. तर शिंदे शिवसेनेसाठी आग्रही आहेत. त्यामुळे या जागेवर अजूनही एकमत होवू शकलेले नाही. तरीही राजेंद्र गावित हे प्रचाराला लागले आहेत.
हितेंद्र ठाकूरही उमेदवार देणार
बहुजन विकास आघाडीनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पालघर लोकसभेत बहुजन विकास आघाडीचा उमेदवार असेल असं हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. पुढील काही दिवसात त्यांचा उमेदवार कोण हे जाहीर होईल. त्यामुळे पालघर मध्ये चौरंगी लढत होणार हे आता निश्चित झालं आहे. त्यामुळे इथ काटे की टक्कर पाहायला मिळेल असं राजकीय निरिक्षकांचे मत आहे.