अमजद खान
कल्याण डोंबिवलीत भाजप आणि शिवसेनेत कुरघोडी सुरु आहे. इथं दोन्ही पक्ष एकमेकांचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या पक्षात घेत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थित कल्याण पूर्वेत शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी विजय जोशी, ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका शीतल मंढारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी या पक्ष प्रवेशाकरीता महत्वाची भूमिका बजावली. यावेळी बोलताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी केडीएमसीचा पुढचा महापौर हा भाजपचाच असेल असा दावा केला. त्याला शिवसेनेनंही जशाच तसे प्रत्युत्तर दिले आहे.
केडीएमसीसाठी भाजपचे निवडणूक अधिकारी नरेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांची भावना आहे की, केडीएमसीत भाजपचा महापौर बसला पाहिजे. इतकेच नाही तर भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी सांगितले की, पब्लीक सब जानती है, युती होणार की नाही? महापौर भाजपचाच बसणार असा पुनर्रुच्चार त्यांनी केला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी एका कार्यक्रमात पब्लीक सब जानती है महापौर कोणाचा बसणार असे वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष परब यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
2026 ला महापालिका निवडणूका होतील. कल्याण डोंबिवली महापालिकेतही शिवसेनेचाच महापौर बसेल. कोणाही कावळ्याने कुठली कोल्हे कुई केली. ती कोल्हे कूईच राहणार आहे. त्यामुळे कोण काय बोलते त्यावर आम्ही लक्ष देणार नाही. आमचे उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील यावर आमचे लक्ष राहणार आहे.त्यामुळे भाजपचे नंदू परब काय बोलत आहे, त्याकडे लक्ष देण्यासाठी शिवसेनाला वेळ नाही असे प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी व्यक्त केली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. यात भाजप आणि शिवसेने शिंदे गटाने जरोदार मुसंदी मारली आहे. ही निवडणूक शिवसेना विरुद्ध भाजप अशीच होणार आहे. या महापालिकेत शिवसेनेची ताकद आहे. पण शिवसेनेत फुट पडल्यानंतर महापालिकेची होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या फुटीचा फायदा भाजपला उचलण्याची संधी आहे. तर शिवसेना शिंदे गटाला आपली ताकद दाखवायची आहे. अनेक वर्षापासून कल्याण डोंबिवली महापालिकेत युतीचा झेंडा फडकला आहे. त्यात महापौर हा शिवसेनेचाच राहीला आहे. त्यामुळे पद कायम राखण्याचे आव्हान शिवसेना शिंदे गटा समोर आहे.