लातूर हे 21 व्या शतकात मराठवाड्यातील लक्षवेधी वेगानं विकसित झालेलं शहर आहे. 1982 साली तेंव्हाच्या उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूरची निर्मिती झाली. गेल्या चार दशकात संपूर्ण देशात लातूरनं स्वत:ची खास ओळख निर्माण केलीय. 10 आणि 12 वी च्या परीक्षेत सर्वाधिक मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं शहर म्हणजे लातूर. त्यांच्या सातत्यपूर्ण यशाच्या 'लातूर पॅटर्न' चं आजही कायम असून त्याचं संपूर्ण राज्यात अप्रूप आहे.
विलासराव देशमुख आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर हे दोन महाराष्ट्राला मुख्यमंत्री याच जिल्ह्यानं दिले. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे देखील लातूरचे खासदार होते. आता विलासराव यांचे चिरंजीव अमित आणि धीरज देशमुख लातूर जिल्ह्यात आमदार आहेत. तर शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा वारसा त्यांचे नातू संभाजी पाटील निलंगेकर चालवत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजकीय सुपीक पण...
राजकीय दृष्ट्या सुपीक असलेल्या लातूर जिल्ह्यानं दुष्काळाची दाहकता वारंवार अनुभवलीय. विलासराव देशमुख 8 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यापूर्वी त्यांनी सातत्यानं राज्य मंत्रिमंडळात मंत्री होते. महाराष्ट्र काँग्रेसमधील दिग्गज नेते म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. शिवराज पाटील चाकूरकर ही केंद्रात सातत्यानं महत्वाची जबाबदारी सांभाळत होते. विलासरावानंतर अमित देशमुख त्यांचा राजकीय वारसा चालवत आहेत. या सर्व दिग्गजांनी सातत्यानं प्रतिनिधित्व करुनही लातूरला रेल्वेनं पाणी देण्याची वेळ आली होती.
2014 साली डॉ. सुनील गायकवाड आणि 2019 साली सुधाकर श्रृगांरे हे भाजपाचे उमेदवार विजयी झाले. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा श्रृंगारे भाजपाचे उमेदवार होते. तर काँग्रेसकडून अमित देशमुख यांचे निकटवर्तीय समजले जाणारे डॉ. शिवाजीराव काळगे रिंगणात होते.
( नक्की वाचा : दक्षिण मध्य मुंबईत मतदानाचा घसरलेला टक्का कोणाच्या पथ्यावर? )
मतदारसंघाची रचना
2008 साली झालेल्या फेररचनेत लातूर लोकसभा मतदारसंघ राखीव झाला. या मतदारसंघात लातूर शहर, लातूर ग्रामीण, अहमदपूर, उदगीर आणि निलंगा हे लातूर जिल्ह्यातील पाच आणि लोहा या नांदेड जिल्ह्यातल्या एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर काँग्रेसची शक्ती ही लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या मतदारसंघापुरती मर्यादीत झालीय. अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे विलासरावांचे दोन मुलं इथून आमदार आहेत. शेजारच्या नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण भाजपामध्ये गेल्यानंतर देशमुख बंधूही भाजपावासी होणार अशी चर्चा होती. पण, अमित देशमुख यांनी ती शक्यता फेटाळत काँग्रेसमध्येच राहणं पसंत केलंय.
संजय बनसोडे ( अहमदपूर, राष्ट्रवादी), बाबासाहेब पाटील (उदगीर, राष्ट्रवादी), संभाजी पाटील निलंगेकर (निलंगा, भाजपा) आणि श्यामसुंदर शिंदे (लोहा, अपक्ष) हे लातूर लोकसभा मतदारसंघातील अन्य आमदार आहेत. सहापैकी 2 आमदार महाविकास आघाडीचे तर चार आमदार हे महायुतीचे आहेत.
( नक्की वाचा : दक्षिण मुंबईत सेना विरूद्ध सेना, निकालाबाबत काय आहेत अंदाज? )
मतदानाचा पॅटर्न
लातूर शहर आणि ग्रामीण हे दोन विधानसभा मतदारसंघ हे काँग्रेसचे बालेकिल्ले समजले जातात. या मतदारसंघात किती आघाडी मिळते त्यावर काळगे यांचं भवितव्य अवलंबून असेल. तर निलंगा, उदगीर, लोहा आणि अहमदपूर हे मतदारसंघ किती साथ देणार यावर भाजपाचे श्रृंगारे पुन्हा विजयी होणार का हे ठरणार आहे.
( नक्की वाचा : छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या राजधानीवर कुणाचा फडकणार झेंडा? )
चर्चेतील मुद्दे
लातूर लोकसभा मतदारसंघात पाणी प्रश्न, बेरोजगारी, रेल्वे कोच कारखाना, शेतमालाला भाव, सिंचन व्यवस्था, रस्ते हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. काँग्रेसनं लिंगायत समाजाचा विचार करत शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी दिल्यानं या निवडणुकीत रंगत निर्माण झालीय. संपूर्ण देशमुख कुटुंब काळगे यांच्या प्रचारासाठी उतरलं होतं. त्यामुळे काळगे यांचा विजय हा देशमुख घराण्यासाठी प्रतिष्ठेचा आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या प्रचारसभा झाल्या. पण, या दोन्ही नेत्यांनी स्थानिक मुद्यांवर फोकस न करता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. हा मुद्दा देखील मतदारांमध्ये चर्चेचा ठरला. यापूर्वी दिग्गज नेत्यांना पराभवाचं आस्मान दाखवणारे लातूरकर मतदार या निवडणुकीत काय निर्णय घेतात हे चार तारखेलाच स्पष्ट होईल.