जाहिरात

दक्षिण मुंबईत सेना विरूद्ध सेना, निकालाबाबत काय आहेत अंदाज?

कधी काळी काँग्रेस आणि भाजपचा गड असलेल्या या मतदार संघात यावेळी थेट शिवसेना ठाकरे विरूद्ध शिवसेना शिंदे यांच्यात थेट लढत होत आहे.

दक्षिण मुंबईत सेना विरूद्ध सेना, निकालाबाबत काय आहेत अंदाज?
मुंबई:

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात पाचव्या टप्प्यात मतदान झाले. उच्चभ्रूं बरोबरच मध्यमवर्गीय असा समिश्र असलेल्या या मतदार संघात 50.06 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.  2019 च्या तुलनेत दिड टक्का मतदान कमी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे कमी झालेले मतदान कोणाच्या पथ्थ्यावर पडणार याची उत्सुकता आहे. कधी काळी काँग्रेस आणि भाजपचा गड असलेल्या या मतदार संघात यावेळी थेट शिवसेना ठाकरे विरूद्ध शिवसेना शिंदे यांच्यात थेट लढत होत आहे. ठाकरे गटाकडून माजी मंत्री आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत हे मैदानात आहेत तर शिंदे गटाने विद्यमान आमदार यामिनी जाधव यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे मतदानानंतर विजयाची गणीतं हे दोन्ही उमेदवार मांडत आहेत. 

कोणाची सरशी होणार? 

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात वरळी,शिवडी,भायखळा,मलबार हिल,मुंबादेवी आणि कुलाबा या विधानसभा येतात. त्यापैकी  वरळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरळीतून आदित्य ठाकरे, शिवडीमध्ये अजय चौधरी हे दोन आमदार आहेत. तर शिंदे गटाच्या यामिनी जाधव या भायखळ्याच्या आमदार आहे. मुंबादेवीमध्ये काँग्रेसचे आमिन पटेल हे आमदार आहेत. तर  कुलाब्यातून भाजपचे राहुल नार्वेकर तर मलबार हिलमधून मंत्री मंगलप्रभात लोढा आहे आमदार आहे. पक्षीय बलाबल पाहीले असता ठाकरे गट 2, भाजप 2 आणि काँग्रेस 1  आणि शिंदे गट 1  असे आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती पाहात समसमान पक्षीय बलाबल या मतदार संघात आहे. वरळी, शिवडी, भायखळा हा मराठी बहुल भाग समजला जातो. ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग या मतदार संघात आहे. याचा फायदा थेट अरविंद सावंत यांना होऊ शकतो अशी चर्चा आहे. तर मलबार हिल आणि कुलाबा हे भाजपचे बालेकिल्ले आहेत ही यामिनी जाधव यांच्यासाठी जमेची बाजू आहे. मुंबादेवीवर काँग्रेसची चांगली पकड आहे. त्यामुळे इथे ही सावंत यांना आघाडी मिळू शकते. मात्र बदलत्या राजकारणात काँग्रेसच नेते मिलींद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांचा किती फायदा यामिनी जाधव यांना होतो हेही पाहावं लागणार आहे. 

Latest and Breaking News on NDTV

प्रचारातले मुद्दे काय? 

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघ हा समिश्र रहिवाशी असलेला मतदार संघ आहे. जुन्या चाळींचा प्रश्न वरळी, शिवडी, मुंबादेवी, या भागात आहे. एकीकडे उच्चभ्रू तर दुसरीकडे मध्यम वर्ग अशी रचना या मतदार संघाची आहे. समुद्र किनारा आणि त्या बाजूला असेल्या कोळीवाड्यांचा प्रश्न या मतदार संघात आहेच. गिरणी कामगारांचा हा मतदार संघ अशीही याची ओळख. त्यांचे प्रलंबित असलेले प्रश्नही निवडणुकीच्या केंद्रस्थानी होतेच. पण या निवडणुकीत या मुद्यांपेक्षा जास्त चर्चा झाली ती कोण गद्दार आणि कोण इमानदार याचीच... मुंबई महाराष्ट्रा पासून तोडण्याचा मुद्दाही यात तापला होता. मुंबईतले उद्योग गुजराकडे नेले जात असल्याचा प्रश्नही उपस्थित केला गेला. तर दुसरीकडे कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल आणि मोदींनी केलेली विकास कामे यांचाही बोलबाला प्रचारात होता. पण सर्वांचे लक्ष वेधले होते ते गद्दार विरूद्ध इमानदार यामुद्द्याकडेच. या मुद्द्या भोवतीच दक्षिण मुंबईची निवडणूक फिरत होती.    

Latest and Breaking News on NDTV

2019 चा काय होता निकाल? 

2019 च्या सार्वत्रिक  निवडणुकीत, मुंबई दक्षिणमध्ये चुरशीची लढत झाली. या मतदारसंघात 2019 मध्ये 51.46% मतदान झाले. शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांना 4,21,937 मते मिळाली होती. तर काँग्रेलसच्या देवरा मिलिंद मुरली यांना 3,21,870 मते मिळाली होती. जवळपास 1,00,067 मतांच्या फरकाने सावंत हे  2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाले होते. 

Latest and Breaking News on NDTV

काय आहे इतिहास?

स्वातंत्र्यानंतरचे मुंबई काँग्रेसमधील दिग्गज नेते स.का. पाटील हे दक्षिण मुंबईचे पहिले खासदार. 1952, 1957 आणि 1962 साली ते या मतदारसंघातून निवडून आले. 1967 साली जॉर्ज फर्नांडीस यांनी त्यांचा पराभव करत 'जायंट किलर' अशी स्वत:ची ओळख देशभर निर्माण केली. 1971 च्या इंदिरा लाटेत काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघानं 1977 आणि 80 मध्ये जनता पार्टीला कौल दिला. 1984 मध्ये मुंबई काँग्रेसमधील आणखी एक दिग्गज नेते मुरली देवरा इथून पहिल्यांदा खासदार झाले. 1996 आणि 1999 मध्ये भाजपाच्या जयंतीबेन मेहता इथून निवडून आल्या होत्या.  2004 आणि 2009 मध्ये मिलिंद देवरा यांच्या रुपानं काँग्रेसचा इथून खासदार होता. त्यानंतर गेली दहा वर्ष शिवसेनेचे अरविंद सावंत इथून खासदार आहेत. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर अरविंद सावंत उद्धव ठाकरे गटामध्ये असून ते विजयाची हॅट्र्रिक करण्याच्या उद्देशानं यंदा मैदानात उतरणार आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

मनसेची मते कोणाच्या पारड्यात?  

दक्षिण मुंबईतील वरळी, शिवडी, भायखळा या मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या मोठी आहे. मनसेची चांगली ताकद या मतदार संघात आहे. मनसेने महायुतीला पाठींबा दिला आहे. त्यामुळे मनसेचीही मते महायुतीच्या उमेदवाराला मिळतात का हा प्रश्नही महत्वाचा आहे. 2009 च्या निवडणुकीत या मतदार संघात मनसेने मुसंडी मारत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. मात्र 2014 ला ही स्थिती बदलली. मनसे ऐवजी मराठी मतदारांनी शिवसेनेला पसंती दिली होती. आता हेच मतदार निर्णायक ठरू शकतात.  शिवाय मुस्लिम मतदारांची संख्या इथे मोठी आहे. काँग्रेसचे पारंपारीक हे मतदार आहे. शिवाय एमआयएमला मानणारेही हे मतदार आहेत. त्यामुळे ते यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या पारड्यात मतं टाकतात की शिंदेंकडे वळतात हेही महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे मराठी मतदार आणि निर्णयक ठरणारा मुस्लिम मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतो यावरच दक्षिण मुंबईचा निकाल अवलंबून आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com