लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी देशभरात नुकतच मतदान पार पडलं. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. त्याआधीच भाजपने लोकसभा निवडणुकीत आपलं खातं उडलं आहे.
गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झाले आहे. कारण सूरतमधील काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. याशिवाय येथील सर्व उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे मुकेश दलाल यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी दलाल याना संसद सदस्यत्वाचं प्रमाणपत्र देखील दिलं आहे.
(नक्की वाचा - "निवडणूक आयोग भाजपची चमचेगिरी करणारा आयोग", अंबादास दानवेंचं टीकास्त्र)
काँग्रेस उमेदवाराचा अर्ज वाद का झाला?
भाजपकडून निलेश कुभांनी यांचे समर्थक म्हणून सह्या करणाऱ्यावर आक्षेप घेण्यात आला होता. या समर्थकांच्या सह्यांमध्ये विसंगती असल्याचं आढळून आलं होते. समर्थकांनी प्रतिज्ञापत्रात आपण सह्या केल्या नसल्याचं देखील म्हटलं होतं.
काँग्रेसचे गुजरात प्रदेशाध्यक्ष शक्तिसिंह गोविल यांनी यावरुन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. सूरत लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भाजपच्या सांगण्यावरुन रद्द करण्यात आल्याचा आरोप शक्तिसिंह गोविल यांनी केला आहे. ही घटना म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. केवळ सहीमध्ये तफावत आढळल्याने काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभाणी यांचा अर्ज रद्द ठरवण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस सूरत लोकसभा निवडणुकीतून बाद झाली आहे. कारण पर्यायी उमेदवारी सुरेश पडसाला यांचा उमेदवारी अर्ज देखील फेटाळण्यात आला आहे.
(नक्की वाचा - आंबेडकरांना धक्का! वंचितमध्ये फूट? 'या' जिल्ह्यात फटका बसणार?)