लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याकरता मतदान केंद्रावर पायी जात असताना एका मतदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना महाड तालुक्यातील दाभेकर कोंड या ठिकाणी घडली आहे. तालुक्यातील किंजकोळी गावाजवळ असलेल्या दाभेकर कोंड मतदार केंद्राजवळ काही अंतरावरच ही घटना घडली आहे. आज लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात असताना एक दु:खद घटना घडली आहे.
मतदान केंद्रापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असताना मतरादाचा मृत्यू ओढावल्याची घटना महाड तालुक्यात घडली आहे. येथील किंजळोली दाभेकर कोंडमध्ये मतदानाला निघालेल्या प्रकाश चिनकटे यांनी प्राण गमावला. प्रकाश यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला स्थानिक प्रशासनाने दुजोरा दिला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रकाश चिनकटे यांना लगेच महाडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. म्हणजेच रुग्णालयात जाण्याआधीच मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यासंदर्भातील चाचण्या आणि तपासण्या केल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण समोर येईल असं सांगितलं जात आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये भाजपाचे नारायण राणे आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यामध्ये थेट लढत आहे.
नक्की वाचा - मोठी बातमी! महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी 500 रुपये अन् दारू वाटप?
मतदानात उन्हाच्या तडाख्याचा अडथळा...
मतदानाला जाणाऱ्या मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी सावलीसाठी मतदानकेंद्रांबाहेर मंडप टाकण्यात आले आहेत. पण मतदान केंद्रावर पोहचण्याआधीच महाडमधील या मतदाराला चक्कर आली. त्यातच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. उन्हाच्या झळा दुपारी 12 नंतर अधिक तीव्र आणि दाहक होतात. त्यामुळेच सकाळच्या सत्रात मतदान करण्याचा कल अनेक ठिकाणी मतदारांमध्ये दिसून येतो. मात्र सकाळी आठ वाजल्यापासूनच अनेक भागांमध्ये उन्हाचा त्रास जाणवू लागतो. त्यामुळेच मतदारांनी काळजी घ्यावी असं आवाहन स्थानिक प्रशासनाद्वारे केली जाते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world