तिरंगी लढतीमध्ये इतिहास बदलण्याचं आंबेडकरांसमोर आव्हान

Akola Lok Sabha : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरही अकोलातून निवडणूक लढवत असल्यानं या निवडणुकीकडं फक्त राज्याचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
अकोला लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत आहे.
अकोला:

भारतीय जनता पक्षाला गेल्या 3 दशकांपासून साथ देणाऱ्या मतदारसंघांमध्ये अकोलाचा समावेश आहे. 1989 साली इथून सर्वप्रथम भाजपाचे पांडुरंग फुंडकर विजयी झाले. तेव्हापासून 9 पैकी 7 वेळा अकोल्यात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे. पांडुरंग फुंडकर यांनी 3 वेळा तर संजय धोत्रे यांनी 4 वेळा अकोलाकरांचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नेटवर्क आणि हिंदुत्वाला अनुकूल मतदारांचा भाजपाला नेहमीच फायदा होत आलाय. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरही अकोलातून निवडणूक लढवत असल्यानं या निवडणुकीकडं फक्त राज्याचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष आहे.

पुन्हा तिरंगी लढत

भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या तीन पक्षांमध्ये यंदा पुन्हा एकदा लढत होत आहे. इतर पक्षांवर घराणेशाहीचे आरोप करणाऱ्या भाजपानं अकोल्यातून संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिलीय.

महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील जागा वाटपाची चर्चा बराच काळ लांबली. वंचित आघाडीनं काही जांगावर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. त्यामुळे अकोल्यात आंबेडकरांना मविचा पाठिंबा मिळेल असं मानलं जात होतं.

काँग्रेसनं ही समजूत मोडून काढत डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे धोत्रे विरुद्ध आंबेडकर ही थेट वाटणारी लढत तिरंगी बनली आहे. अकोल्यात गेल्या साडेतीन दशकांमध्ये दोन निवडणुकांचा अपवाद वगळता नेहमी तिरंगी लढत झालीय. या लढतीमध्ये मतविभागणी आणि जातीय समीकरणाचा भाजपाला फायदा झालाय. 

अमरावतीत विरोधकांची एकी, वाढवणार नवनीत राणांची डोकेदुखी?
 

काँग्रेसकडून मराठा कार्ड

काँग्रेसनं 2019 साली झालेल्या निवडणुकीत मुस्लीम उमेदवार दिला होता. यावेळी मराठा समाजाच्या अभय पाटी यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे हिंदू आणि त्यामध्येही विशेषत: मराठा जातीचं भाजपाची मत विभागली जातील असा अंदाज आहे.

अकोल्यात ओबीसी, माळी, धनगर, आदिवासी आणि मुस्लीम मतांची मोठी संख्या आहे. या एकगठ्ठा मतदारांमध्ये कशी विभागणी होईल यावर येथील निवडणुकीचं चित्रं अवलंबून असेल.

Advertisement

आंबेडकरांना किती आशा? 

प्रकाश आंबेडकर यांना मुस्लीम मत मिळतील अशी आशा आहे. त्याचबरोबर मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांच्याशी असलेल्या जवळीकतेमुळे मराठा मतं देखील मिळतील अशी आशा आहे. गेल्या चार निवडणुकांमध्ये इथून भाजपा खासदार निवडून येतोय.  भाजपानं उमेदवार बदलला असला तरी धोत्रे घराणं कायम ठेवलंय.  वडिलांवर नाराज असलेल्या मतदारांचा फटकाही अनुप धोत्रेंना बसू शकतो.

काँग्रेसच्या ताब्यातील चंद्रपूर पुन्हा जिंकण्यासाठी भाजपासमोर 3 मोठी आव्हानं
 

भाजपाची कशावर आशा?

1989 साली रामजन्मभूमी आंदोलनाला सुरुवात झाली. त्यावेळी अकोल्यात भाजपानं पहिल्यांदा निवडणूक जिंकली. आता अयोध्येतील रामजन्मभूमीच्या ठिकाणी भव्य मंदिर झाल्यानंतर ही पहिली लोकसभा निवडणूक आहे. अकोल्यातील हिंदुत्ववादी मतदार आपल्याला साथ देईल हा भाजपाला विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा आणि तळागळापर्यंत असलेलं रा.स्व. संघ आणि भाजपा कार्यकर्त्यांचं नेटवर्क ही देखील धोत्रे यांची जमेची बाजू आहे. त्याचबरोबर तिरंगी लढतीमुळेही त्यांचा मार्ग काहीसा सोपा झालाय.

Advertisement

कधी होणार मतदान? - अकोला मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या 26 एप्रिल रोजी होणार आहे.