Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सर्वत्र प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) देखील गावोगावी जाऊन सभांना संबोधित करत आहेत. नुकतेच कराडमधील एका गावामध्ये त्यांची जाहीरसभा पार पडली. या सभेदरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना उदयनराजेंनी पोलिसांशी संबंधित वादग्रस्त विधान केले. त्यांनी केलेल्या विधानाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. "पोलीस त्यांचे काम करत नसतील तर मी त्यांना मारायला देखील कमी करत नाही", असे वादग्रस्त वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी भरसभेत केले.
(नक्की वाचा: दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेच्या वाट्याला? यामिनी यशवंत जाधव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता)
नेमके काय म्हणाले उदयनराजे भोसले?
सभेदरम्यान उपस्थितांना संबोधित करताना उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) म्हणाले की, "मला वावगे काही खपत नाही. जर एखादा बलात्कार झाला तर मी पोलिसांना पण मारायचे कमी करत नाही. ज्या कामासाठी तुमची नेमणूक केली आहे आणि तुम्ही ते काम करत नसाल तर करणार काय? कोणत्याही प्रकारचा अन्याय मी सहन करू शकत नाही. मी राजकारण कधीही केले नाही, सर्वसामान्य माणसांच्या हिताचे मी समाजकारण जोपासण्याचे काम केले आहे. अख्खा जिल्हा जरी एका बाजूला असेल आणि एखादा चुकीचा निर्णय घेतला गेला तर मी त्यास विरोध केला आहे. जे योग्य आहे ते योग्य नाही आणि जे योग्य नाही ते योग्य नाहीच. लोकहिताच्या विरोधात काही घडत असेल तर ते अडवणे हे नैतिकदृष्ट्या माझे कर्तव्य आहे".
(नक्की वाचा: शक्तिप्रदर्शनाने गाठली 'उंची'; छत्रपती संभाजीनगरमध्ये साहेबांच्या उमेदवारी अर्जाची गावभर चर्चा)
दरम्यान उदयनराजे भोसले यांच्या विधानावर पोलिसांच्या कुटुंबीयांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. जे पोलीस कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र झटत आहेत, उदयनराजेंनी त्यांनाच मारण्याचे विधान केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
(नक्की वाचा: 'उशीरा उमेदवारी दिली त्यातच उदयनराजेंचा पराभव', जयंत पाटलांची टीका)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world