भाजपाचं संकल्पपत्र हे पूर्ण होण्यासाठी असतं. आम्ही जी आश्वासनं देतो ती पूर्ण करतो. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द करणे तसंच अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी मंदिर उभारण्याचं आश्वासन आम्ही पूर्ण केलं. या टर्ममध्ये मुंबईतून अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्यांना हद्दपार करणार, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. मुंबईतील बोरिवलीमध्ये झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
संपूर्ण राज्यात महायुतीचं वातावरण
मी महाराष्ट्रभर फिरलो आहे. महाराष्ट्र विधानसभेचा निकाल स्पष्ट आहे. 23 तारखेला महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. आघाडीचा सुपडा साफ होईल. पंतप्रधान मोदींचं वचन ही दगडावरची रेघ आहे. भाजपाचं संकल्पत्र हे पूर्ण होण्यासाठी असते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंनी जी आश्वासनं पूर्ण होईल, तेच द्या असा सल्ला पक्षाला दिला होता. खर्गेसाहेब तुम्हाला तुमचा पक्षही ऐकत नाही. आघाडीनं जे आश्वासन दिलं ते पूर्ण होणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.
आम्ही 370 कलम रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याला विरोधी पक्षांनी विरोध केला. कलम 370 रद्द केले तर रक्ताचे पाट वाहतील, असं विरोधी पक्षांनी म्हंटलं होतं. आज 6 वर्ष झाली. देशात रक्ताचे पाट वाहणे सोडा दगड फेकायची हिंमत नाही.
सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं की गृहमंत्री असताना त्यांना काश्मीरला जायला भीती वाटत होती. शिंदे साहेब आता नातवंडासह काश्मीरला जा, तुम्हाला भीती वाटणार नाही, असा सल्लाही अमित शाह यांनी दिला.
( नक्की वाचा : विदेशी मानसिकतेच्या काँग्रेसकडून नेहमीच महाराष्ट्राचा द्वेष, पुण्यातील सभेत PM मोदींचा प्रहार )
साडेपाचशे वर्षांनी रामल्लानं आपली दिवाळी भव्य मंदिरात केली. आम्ही दिलेलं हे आश्वासन पूर्ण केलं. नरेंद्र मोदींचं सरकार जे सांगतं ते पूर्ण करतं. आम्ही 2019 मध्ये CAA कायदा आणला. त्यामुळे बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तानमधील हिंदू नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळालं. मोदी सरकारनं ट्रिपल कायदा रद्द केला.
कर्नाटक वक्फ बोर्डनं गावं, शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फची संपत्ती म्हणून घोषित केली. पण, काळजी करु नका. मोदी सरकार या कायद्यात सुधारणा करणार आहे. पवारसाहेब हवा तितका विरोध करा, वक्फ संशोधन विधेयक संसदेत पास होणार आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी होती. मी शरद पवारांकडं हिशेब मागतो, तुम्ही दहा वर्ष केंद्रात मंत्री होता. तुम्ही काय केलं? असा सवाल त्यांनी विचारला. हे काम आम्ही पूर्ण केलं. 10 वर्षांपूर्वी मुंबईत वाहतूक कोंडी होती. आम्ही अटल सेतू पूर्ण केला. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन काही वर्षांमध्ये सुरु होईल. कोस्टल रोडचं 87 टक्के काम पूर्ण झालं आहे. दोन वर्षांंमध्ये कोस्टल रोडही सुरु होईल. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग पूर्ण झाला आहे.
मी आज हे सांगतोय, मुंबईकरांनो, ही टर्म मुंबईतील प्रत्येक बांगलादेशी आणि रोहिंग्याला शोधून-शोधून मुंबईच्या बाहेर करण्याचं काम भाजपाचं सरकार करेल. 370 कलम हटवतं आघाडीकडून विरोध होतो. उस्मानाबाद, औरंगाबाद, अहमदनगरच्य़ा नावाला विरोध करत आहे. उद्धव ठाकरे तुम्ही सत्तेसाठी किती खाली घसरणार कधी रात्री बाळासाहेबांचं स्मरण करुन त्यांचे विचार काय सांगत होते, याचा विचार करा.
राहुल गांधी , शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही. ही 5 वर्ष महायुतीला द्या सगळे सुरक्षित असतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.