विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता जेमतेम आठवडा उरला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात वातावरण थंड असलं तरी राजकीय वातावरण तापलंय. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते जास्तीत जास्त राजकीय सभा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तारुढ शिवसेना पक्षाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर भिस्त आहे. मुख्यमंत्री सध्या राज्यभर जोरदार प्रचार करत आहेत. एका जाहीर सभेच्या दरम्यान मुख्यमंत्री आपल्याच पक्षाच्या खासदारांवर नाराज झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघात हा सर्व प्रकार घडला. कन्नडमध्ये शिवसेना उमेदवार संजना जाधव यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. संजना जाधव या भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत.
( नक्की वाचा : काँग्रेस नेत्यांच्या मुलींची वडिलांच्या CM पदसाठी फिल्डिंग, पटोलेनंतर वडेट्टीवारांच्या मुलीचीही बॅटिंग )
मुख्यमंत्री दिवसातून पाच पेक्षा अधिक सभा घेत असल्याने सभेत भाषणाचे नियोजन करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री येताच त्यांचा सत्कार आणि लगेच भाषण ठेवावं, असेही स्पष्ट निर्देश आहेत. पण कन्नडमध्ये मुख्यमंत्री आल्यानंतर उमेदवार संजना जाधव, माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांची भाषणं बाकी होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना नाराजी लपवता आली नाही.
जाहीर सभेत स्टेजवरच मुख्यमंत्र्यांनी खासदार संदीपान भुमरे यांना हातामधील घड्याळ दाखवलं. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री नाराज असल्याचं स्पष्ट दिसत आहे.