राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अर्ज भरणे आणि मागे घेण्याची मुदत आता संपलीय. त्यामुळे आता सर्वच पक्षाकडून प्रचाराला वेग आलाय. राजकीय सभा, प्रत्यक्ष भेटीगाठी, बैठका या सर्वांबरोबरच निवडणूक काळातील जाहीरनामे हे देखील मतदारांसाठी महत्त्वाचे असतात. आपण सत्तेवर आलो तर काय करणार? हे प्रत्येक राजकीय पक्ष त्यांच्या जाहीरनाम्यात मांडत असतात.
आगामी विधानसभा निवडणूक चुरशीची होणार हा सर्वांचाच अंदाज आहे. या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये चढाओढ लागलीय. त्याचाच भाग म्हणून निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस पाडलाय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कुणाच्या जाहिरनाम्यात काय?
मविआ आणि महायुतीचा विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. मंगळवारी उद्धव ठाकरेंनी 5 गॅरंटी सांगितल्यानंतर महायुतीने 10 गॅरंटी देऊन टाकल्या आहेत. निवडणुकीचा काळ असल्याने सत्ताधारी महायुतीने आधीच त्याची पेरणी करायला सुरुवात केली होती. आता विरोधकांनीही त्यावर कडी केलीय. महायुती 'लाडक्या बहिणी'ला दर महिन्याला 2100 रुपये देणार आहे. सध्या मिळत असलेल्या 1500 रुपयांवरून ही रक्कम वाढविण्यात आली आहे.
तर, महाविकास आघाडी 'लाडक्या बहिणी'ला दर महिन्याला 3000 रुपये देणार आहे. म्हणजेच महायुतीपेक्षा 900 रुपये जास्तीचे देणार असल्याचे आश्वासन महाविकास आघाडीनं दिलंय. तर, महायुतीनं महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांना पोलीस दलात नोकरी देण्याची घोषणा केली आहे.
महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेद्वारे वर्षाला 15 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. एमएसपीवर 20 टक्के अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. तर मविआने शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्याचे जाहीर केले आहे.
( नक्की वाचा : लातूरमध्ये विलासरावांच्या मुलासमोर भाजपाचं तगडं आव्हान, थेट लढतीचा निकाल काय लागणार? )
ठाकरे गटाने पाच वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन दिलेले आहे. तर महायुतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन दिले आहे. महायुतीने प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन दिले आहे. तर ठाकरेंनी धारावी आणि मुंबई परिसरात महाराष्ट्रातील भूमिपूत्रांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करुन देण्याचे वचन दिले आहे.
उद्धव ठाकरेंनी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे वचन दिले आहे. तर काँग्रेसने बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंत मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. महायुतीने 25 लाख रोजगारनिर्मिती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्यावेतन देण्याचे आश्वासन दिले आहे.
महायुतीने वृद्धांना महिन्याला 1500 रुपये वरून 2500 रुपये देण्याचे वचन दिले आहे. 45 हजार गावांमध्ये पांदण रस्ते बांधण्याची घोषणा केलीय. अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15 हजार रुपये आणि विमा संरक्षण देण्याचे सुरक्षा कवच देण्याचे महायुतीने आश्वासन दिले आहे. वीज बिलात 30 कपात करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मविआने यावर अद्याप काही जाहीर केलेले नाही. महायुतीने महिलांना 50 टक्के सवलतीच्या दरात बस प्रवास दिला आहे. तर मविआ महिला आणि मुलींना मोफत बस प्रवास देणार आहे.