Raj Thackeray Speech : राज ठाकरे यांनी प्रचाराचा नारळ फोडला, उद्धव, पवारांसह एकनाथ शिंदेंवरही टीका

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवार यांच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली

जाहिरात
Read Time: 3 mins
डोंबिवली:

अमजद खान, प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. दिवाळी संपताच राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवार यांच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली. मी आज फक्त तुमचं दर्शन घ्यायला आलो आहे. आणखी वातावरण तापायचं आहे, आमचे विचार, आमचा आवाज तापायचा आहे, असं त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

राजू पाटील यांची प्रशंसा

गेली 5 वर्ष आपण महाराष्ट्र पाहतोय... महाराष्ट्रात काय सुरु आहे असा त्यांनी प्रश्न विचारला.  महाराष्ट्रात 2019 साली झालेल्या निवडणुकीत  ज्यांनी मतदान केलं, त्यावेळी तुम्ही दिलेलं मत आता कुठं आहे हे दाखवा. पहिल्यांदा युतीत कोण होतं आणि आघाडीत कोण याचा कशालाही थांगपत्ता नाही, अशी टीका त्यांनी केली. 

कुणी कुठंही गेलं, आमचा राजू विधानभेत एकटा होता. मला त्याच्याबद्दल अभिमान आहे, आमचा आमदार विकणारा नाही तर टिकणारा होता, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. कोव्हिड काळात राजू पाटील यांनी स्वत:चं हॉस्पिटल कोव्हिड सेंटरला दिलं, असं सांगत त्यांनी राजू पाटील यांची प्रशंसा केली.

( नक्की वाचा : अमित की आदित्य? ठाकरे बंधूपैकी कोण जास्त श्रीमंत? निवडणूक प्रतिज्ञापत्रात झालं उघड )
 

तेव्हा का आक्षेप घेतला नाही?

2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर निकाल लागले. सकाळचा शपथविधी झाला. ते लग्न 15 मिनिटांमध्ये तुटलं. कारण काकाने डोळे वटारले. मग लगेच घरी आले, काका मला माफ करा म्हणाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ज्याच्या विरोधात निवडणुका लढवल्या (काँग्रेस, एनसीपी) त्यांच्यासोबत विधानसभेत बसले.  अरे तुमच्यासमोर (उद्धव ठाकरेंसमोर) नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होईल. अमित शाहा म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांना आक्षेप का घेतला नाही? असा सवाल राज यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. 

Advertisement

शिवसेनेतून 40 आमगार घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या मांडीला माडी लावून बसल्यानं आम्हाला श्वासही घेता येत नाही, असं सांगितलं होतं. पण, त्यानंतर ते अजित पवार मांडीवर येऊन बसले. 

महाराष्ट्रातील तरुण-तरुणी काम मागतायत. शेतकरी आत्महत्या करतोय, कामगार कसाबसा काम करतोय, पण यांची मजा सुरु आहे. हे असे का वागतात कारण तुम्ही चिडत नाही. तुम्ही शांत, षंढ, लोण्याच्या गोळ्यासारखे बसलेले असता, अशी टीका राज यांनी केली. 

Advertisement

कुणी कुणाबरोबरही शय्यासोबत करतंय, कुणी कुणाबरोबरही जात आहे, पण कुणालाही शरम नाही. या प्रकारची गद्दारी मी पाहिलीय पण तेव्हा मान खाली घालून जायचे, आता लोकांना काही वाटत नाही. त्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला. आमच्या मतांचा अपमान करुनही काही वाटत नसेल तर महाराष्ट्राला देवच वाचवो, असंही ते म्हणाले.

( नक्की वाचा : बाळासाहेबांचे कार्यकर्ते असते तर.... मनसेनं सांगितला सरवणकरांना त्यांचाच इतिहास! )
 

फोडाफोडीचे जनक शरद पवार 

राज्यातील सर्व फोडाफोडीच्या राजकारणाचे जनक हे शरद पवार आहेत. त्यांनी पहिल्यांदा 78 ला काँग्रेस फोडली. 92 ला शिवसेना फोडली. 2005 मध्ये नारायण राणेंना फोडलं. आता त्याचा पुढचा प्रकार सुरु झाला आहे. पक्ष आणि चिन्ह घेऊन फुटण्याचं प्रमाण सुरु झालंय. 

Advertisement

धनुष्यबाण ही एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी नाही ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे.  माझे कितीही मतभेद असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे शरद पवारांचं अपत्य आहे. अजित पवारांचं अपत्य नाही, असं त्यांनी सांगितलं. 

ही लाडकी बहीण योजना?

मुख्यमंत्र्यांच्या सभेतील व्यासपीठावर मुख्यमंत्री येण्यापूर्वी एक महिला भोजपुरी गाण्यावर नाचते, या व्हायरल क्लिपचा दाखला देत  ही लाडकी बहीण योजना आहे का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाकडं गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केली. 

शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या सर्वांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. कोणताही पक्ष टिकला नाही तरी चालेल, महाराष्ट्र टिकला पाहिजे.  महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, महाराष्ट्रविना राष्ट्रगाडा न चाले. महाराष्ट्र मारण्यासाठी अनेकांचा डोळा आहे. तुमचं लक्ष महाराष्ट्रावर पाहिजे. मी या महाराष्ट्रासाठी तळमळीनं काम करतो. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याची माझी इच्छा आहे, म्हणून मला तुम्ही सत्ता देऊन पाहा, असं आवाहन राज यांनी या सभेत केलं.