मित्र पक्षांकडून काँग्रेसला वाटाण्याच्या अक्षता, राहुल गांधीही नाराज; खापर कोणावर फुटणार?

महायुतीशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरलेल्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी काँग्रेसला दाबण्याची एकही संधी सोडली नसून या दाबामुळे काँग्रेसही गलितगात्र झाल्याचे दिसून येत आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

सागर कुलकर्णी

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे (NCP Sharad Pawar)  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षाची दुसरी यादी जाहीर केली. या यादीमध्ये काही मतदारसंघ असे आहेत जिथे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्षांनी आधीच आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षाने उमेदवारांच्या 3 याद्या जाहीर केल्या आहेत.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महायुतीशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरलेल्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी काँग्रेसला दाबण्याची एकही संधी सोडली नसून या दाबामुळे काँग्रेसही गलितगात्र झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसने आपल्या वाटच्या जागा उद्धव ठाकरेंच्या पक्षाला गेल्याने शुक्रवारी झालेल्या बैठकीतून राहुल गांधी संतापून निघून गेले होते. या घटनेला अवघे काही तासही होत नाही तोच काँग्रेसला हव्या असलेल्या मतदारसंघात शिवसेना (उबाठा)ने आपला उमेदवार जाहीर करून टाकला. 

नक्की वाचा: काँग्रेसची दुसरी यादी आली, 'या' बड्या नेत्यांना पुन्हा संधी, तर वादग्रस्त जागांवरही उमेदवार

वर्सोव्यातून हरून खान, काँग्रेसच्या दोन डझन नेत्यांचा पत्ता कट

मुंबईतील वांद्रे पूर्वची जागा शिवसेना (उबाठा) ने आपल्याकडे घेतली आणि त्याबदल्यात चांदीवलीची जागा काँग्रेसला दिली. वर्सोवा मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेना(उबाठा) पक्षात रस्सीखेच सुरू होती. काँग्रेस नेत्यांना हा मतदारसंघ आपल्या पक्षालाच सुटेल असे वाटत होते.  या मतदारसंघातून माजी मंत्री सुरेश शेट्टी,माजी पोलीस आयुक्त संजय पांडे,अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव महेश मलिक,प्रदेश काँग्रेस सरचिटणीस भावना जैन,माजी आमदार बलदेव खोसा,माजी आमदार कपिल पाटील,माजी नगरसेवक चंगेज मुलतानी, युवक काँग्रेसचे अखिलेश यादव, अवनिश सिंग, मोनिका जगताप यांच्याव्यतिरिक्त अन्य काही असे मिळून एकूण 21 जण इच्छुक होते. हा मतदारसंघ सोपा आहे असे वाटत असल्याने इथल्या इच्छुकांची संख्या अधिक होती. मात्र शिवसेना (उबाठा) पक्षाने शनिवारी तिसरी यादी जाहीर केली आणि वर्सोव्यात आपला उमेदवारही जाहीर करून टाकला.  

आर्वीही काँग्रेसच्या हातून गेला

वर्ध्यातील आर्वी मतदारंघ हा काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ मानला जातो. काँग्रेसच्या अमर काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा ठोकला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी जाहीर केलेल्या यादीमध्ये अमर काळेंची पत्नी मयुरा काळे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेसला या मतदारसंघावरही पाणी सोडावे लागले आहे. 

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला दाबले आहेच शिवाय या दोन पक्षांनी एकमेकांवरही कुरघोडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. या दोन्ही पक्षातील इच्छुकांनी नेत्यांच्या मागे तगादा लावल्याने या दोन्ही मित्र पक्षांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत. शिवसेना (उबाठा)ने इथून रणजित पाटील यांना शुक्रवारी उमेदवारी जाहीर केली होती. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षानेही आपला उमेदवार जाहीर करून टाकला. राशपने माजी आमदार राहुल मोटे यांना उमेदवारी दिली आहे. राहुल मोटे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर रणजित पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, "उद्धव ठाकरेंनी मला लढायला सांगितलंय, त्यामुळे मी लढणार. मित्र पक्षाचा उमेदवार असला तर पक्षश्रेष्ठी त्याबाबत निर्णय घेतील. मला लढायला सांगितलंय त्यामुळे मी लढणार आणि जिंकणार. मी येत्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे."