संजय तिवारी, प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकांचा धुराळा सध्या उडाला आहे. प्रचार संपायला आठ दिवसांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या मुख्य लढत आहे. दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. पण, त्याचवेळी नागपूरमध्ये भलताच प्रकार घडला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी काँग्रेस पक्षावर थेट नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंलाही प्रश्न विचारला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले जाधव?
नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना (उबाठा) पक्षाचे विशाल बरबटे हे अधिकृत उमेदवार आहेत. पण, त्यांना या निवडणुकीत आघाडीतील बंडखोरांची डोकेदुखी सहन करावी लागत आहे.
पूर्व विदर्भात 28 जागा आहेत, त्यापैकी शिवसेना 'उबाठा'ला एकच जागा मिळाली आहे. त्या जागेवरही काँग्रेसचे 3 बंडखोर आहेत, त्यामध्ये जिल्हाध्यक्षांचाही समावेश आहे. त्यांना काँग्रेस ने निलंबित केले तरी ते काँग्रेसच्या अन्य जागांवरील उमेदवाराच्या प्रचारासाठी जात आहेत, नाना पटोले यावर मौन बाळगून आहेत. आमच्यात संवाद सुरु आहे, पण परिणाम मिळत नाही. या सर्वांना कुणाचा पाठिंबा नाही ना? अशी शंका येते, असं परखड मत भास्कर जाधव यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केलं.
( नक्की वाचा : काय सांगता ! राज ठाकरेंच्या सभेचं संजय राऊत यांना निमंत्रण, एक जागाही राखीव )
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्व प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, पण काँग्रेसकडून सातत्यानं मिठाचा खडा टाकला जातोय. एखादा माणूस इतका प्रिय होता तर त्याला अन्य कुठलेही मतदारसंघ देता आला असता, असं मतही जाधव यांनी व्यक्त केलं. मित्रपक्षाकडून सोयीचे राजकारण केले जात आहे. त्यावर तात्काळ कारवाईची अपेक्षा आहे, अशी मागणी त्यांनी केली.