सौरभ वाघमारे, प्रतिनिधी
राज्य विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याचा आज (सोमवार, 4 नोव्हेंबर) शेवटचा दिवस होता. गेल्या काही दिवसांपासून सर्वच प्रमुख पक्ष त्यांच्या बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. या प्रयत्नांना काही ठिकाणी यश आलं. राज्यभरात अनेक बंडखोरांनी अर्ज मागे घेत त्यांच्या मुळ पक्षाला दिलासा दिला. तर काही ठिकाणी बंडखोरांनी माघार घेण्यास नकार दिला. या सर्व घडामोडीमध्ये सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात घडलेल्या नाट्यमय घटना घडली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमकं काय घडलं?
सोलापूर मध्यमधील शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार तोफिक शेख यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी दोन मिनिटं उशीर झाल्याने उमेदवारी अर्ज कायम राहिला. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी दोन मिनिटं उशीर झाल्याने उमेदवारी अर्ज कायम राहिला.
भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या वकिलांनी तोफिक शेख यांच्या अर्ज मागे घेण्याला हरकत घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार गटाचे बंडखोर तौफिक शेख यांची उमेदवारी कायम राहिल्याने एमआयएमच्या फारूक शाब्ददी यांची डोकेदुखी वाढली आहे.
माझ्या समाजातील वरिष्ठांनी समजूत काढल्याने मी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी केंद्रावर आलो होतो. मात्र मला यायला दोन मिनिटं उशीर झाल्याची हरकत घेतल्याने माझा अर्ज कायम राहिला आहे. अर्ज कायम राहिल्यामुळे सोलापूर शहर मध्य मधून निवडणूक लढणार आहे. माझा पाठिंबा कोणाला राहणार याबाबत आगामी काळात निर्णय घेणार असल्याची माहिती शेख यांनी दिली.
( नक्की वाचा : Nawab Malik : राष्ट्रवादी की अपक्ष? नवाब मलिक कोणत्या चिन्हावर लढणार? अखेर संभ्रम संपला! )
अर्ज न भरताच माघारी
सोलापूर मध्य मतदारसंघात तोफिक शेख यांना निवडणूक कार्यालयात जाण्यास उशीर झाल्यानं अर्ज मागे घेता आला नाही. तर सोलापूर दक्षिणमधील काँग्रेस उमेदवार दिलीप माने यांना काँग्रेसकडून वेळीच AB फॉर्म मिळाला नव्हता. दिलीप माने जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात पोहोचले होते. मात्र एबी फॉर्म न मिळाल्याने दिलीप माने हे बराच वेळ तहसील कार्यालयातच थांबून होते. अखेर एबी फॉर्म न मिळाल्यानं त्यांना काँग्रेसचा अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरता आला नव्हता.
सोलापूर शहरात महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांबद्दल घडलेल्या दोन प्रकाराची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.