मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे विद्यमान आमदार अबू आझमी यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नवाब मलिक यांचं आव्हान आहे. मलिक यांना उमेदवारी देण्यास भारतीय जनता पार्टीचा विरोध होता. त्यानंतरही त्यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे.
भाजपाच्या विरोधानंतरही मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ चिन्ह कायम ठेवून त्यावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. मलिक यांच्यासह शिवसेनेच्या बुलेट पाटील यांनही अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघात आता तिहेरी लढत होणार हे नक्की झालं आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज (सोमवार, 4 नोव्हेंबर) शेवटचा दिवस होता.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नवाब मलिक यांनी अर्ज भरतानाही त्यांच्या रॅलीमध्ये भाजपाचा कोणताही झेंडा नव्हता. त्यावर अजित पवार आमच्यासोबत आहेत तर आम्हाला कुणाचीही गरज नाही, असं मलिक यांनी सांगितलं होतं. या निवडणुकीनंतर अजित पवार किंगमेकर ठरतील, असा त्यांचा दावा आहे.
अणुशक्तीनगरमध्ये मलिक यांच्या कन्या रिंगणात
नवाब मलिक यांच्या पारंपारिक अणुशक्तीनगर मतदारसंघात त्यांच्या कन्या सना मलिक या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या फवाद अहमद यांचं आव्हान आहे. अहमद हे अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती आहेत.
( नक्की वाचा : मुंबईत 20 टक्के मुस्लीम पण तिकीट देण्यात कंजुसी का? बड्या नेत्याची नाराजी, MVA ला फटका बसणार? )
सना मलिकांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, माझे वडील तुरुंगात असताना मी त्यांच्या अणुशक्तीनगरमध्ये खूप काम केले. फहाद अहमद अभिनेत्री स्वरा भास्करचे पती असल्याशिवाय त्यांची कोणतीही मोठी ओळख नाही. या जागेवर माझ्यासाठी कोणतेही आव्हान नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world