काही महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्याने काँग्रेसला साथ दिली. भाजपचा पार धुव्वा उडाला. लोकसभेत मिळालेलं यश आपलंच आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांना जागा सोडण्याचा प्रश्न उद्भवत नाही अशी टोकाची भूमिका काँग्रेसने चंद्रपुरात घेतली होती. काँग्रेसची ही भूमिका घटक पक्षातील स्थानिक नेत्यांना रुचली नव्हती. त्यात जवळच्याना उमेदवारी देण्याचा अट्टाहास काही काँग्रेस नेत्यांनी धरला होता. त्यामुळे काहींनी बंडखोरी केली. तर लोकसभेत एकीने काम करणारे काही नेते प्रचारापासून लांब राहीले. याच्या फटका सहा विधानसभा क्षेत्रात बसला. महाविकास आघाडीला सहा पैकी केवळ ब्रह्मपुरी येथील एका जागेवर विजय मिळवता आला. लोकसभेप्रमाणे आघाडी टिकली असती तर सहा मतदार संघातील चित्र वेगळे असते अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांनी एकजुटीने काम केलं. त्यामुळे खासदार प्रतिभा धानोरकर यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. सहा मतदार संघात मताची आकडेवारी थक्क करणारी होती. मताची आकडेवारी बघता काँग्रेस नेत्यांच्या मनावरील ताबा सुटला. मिळालेली मते काँग्रेसची आहेत. असा गोड समज त्यांनी केला. सहापैकी एकही जागा घटक पक्षाला सोडायला काँग्रेस तयार नव्हती. काँग्रेसच्या हा हट्ट भाजपसाठी फायदेशीर ठरला. अवघे सहा महिन्यापासून राजुरा मतदार संघात सक्रिय असलेले, पार्सल अशी टीका झालेले भाजपचे देवराव भोंगळे यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांचा पराभव केला.
ट्रेंडिंग बातमी - पाडा पाडा पाडा! असं पवारांनी ज्या मतदार संघात सांगितलं, तिथं काय झालं?
वरोरा विधानसभेत खासदार प्रतिभा धानोरकर याचा 'बंधूहट्ट 'काँग्रेसला नडला. काँग्रेसचे उमेदवार आणि खासदार धानोरकर यांचे बंधू प्रविण काकडे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. दिवंगत संजय देवतळे यांना सत्तेतून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी बाहेर केले होते. देवतळे यांचे पुत्र आणि भाजपचे उमेदवार करण देवतळे यांचा येथे विजय झाला. राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा विजय झाला खरा. मात्र भाजपचे कृष्णा सहारे यांनी त्यांना घाम फोडला. उमेदवारी मिळवण्यासाठी इथून तिथून भटकंती करणारे किशोर जोरगेवार शेवटी भाजपवासी झाले. त्यांच्या भाजप प्रवेशाला सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोध होता.
ट्रेंडिंग बातमी - दिलीप वळसे पाटील हरलेली बाजी जिंकले, तुतारी - पिपाणीच्या घोळ पथ्थ्यावर
भाजपचे स्थानिक कार्यकर्ते विरोधात जातील अशी चर्चा होती. त्यातच भाजपचे खंदे कार्यकर्ते ब्रिजभूषण पाझारे यांनी बंडखोरी केली होती. मात्र याचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही. जोरगेवार मोठ्या मताने विजयी झालेत. चिमूर मतदार संघात काँग्रेसच्या सतीश वारजुरकर यांनी टोकाची लढाई दिली. शेवटी भाजपचे बंटी भांगडिया यांनी येथे विजयाची हॅट्रिक साधली. अपेक्षा नुसार बल्लारपूर मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांचा विजय झाला. काँग्रेसचा बंडखोर उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे बंड काँग्रेसचा पराभवला कारणीभूत ठरले. गावतुरे यांना उमेदवारी मिळाली असती तर मुनगंटीवार यांना विजय मिळवणे जड गेलं असतं, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बलाबल
भाजप - 5
काँग्रेस - 1
चंद्रपूर -
किशोर जोरगेवार, भाजप 106841
प्रविण पडवेकर काँग्रेस 84037
जोरगेवार यांचा 22804 मतांनी विजय
बल्लारपूर - सुधीर मुनंटीवार, भाजप 105969
संतोष रावत, काँग्रेस - 79984
मुनगंटीवार यांचा 25985 मताने विजय
वरोरा -
करण देवतळे, भाजप 65170
मुकेश जीवतोडे 49720
देवतळे यांचा 15450 मताने विजय
राजुरा -
देवराव भोंगळे, भाजप 72882
सुभाष धोटे काँग्रेस 69828
भोंगळे यांचा 3054 मताने विजय
चिमूर -
कीर्ती भांगडिया, भाजप 116495
सतीश वारजूरकर काँग्रेस 106642
वारजूरकर यांचा 9853
ब्रम्हपुरी -
विजय वडेट्टीवार, काँग्रेस 114196
कृष्णलाल सहारे भाजप 100225
वडेट्टीवार यांचा 13971 मतांनी विजय
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world