निवडणुकीच्या फडात नात्यात कुस्ती! नवी मुंबई ते गडचिरोली, व्हाया बारामती!

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार ही काका पुतण्यांमध्ये लढत होणार आहे. बारामती मतदारसंघ हा शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबीय देखील बारामतीच्या रिंगणात आमने-सामने आले. 

बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद-भावजयीमध्ये लढत झाली होती. त्यामध्ये सुप्रिया सुळे विजयी झाल्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा बारामतीमध्ये एकाच घराण्यातील दोन सदस्य आमने-सामने आले आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

निवडणुकीच्या फडात नातेवाईक आमने-सामने किंवा वेगवेगळ्या पक्षातून लढण्याची हे पहिलंच उदाहरण नाही.  अनेक राजकीय घरं निवडणुकीच्या राजकारणात दुभंगलेली आहेत. त्यांच्या घरातील सदस्यांनी तिकीट मिळवण्यासाठी वेगळ्या पक्षांचा हात पकडला आहे. 

नवी मुंबई पासून ते गडचिरोली जिल्ह्यापर्यंतच्या राजकीय घराण्यातील सदस्य यंदा वेगवेगळ्या पक्षांकडून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.

नवी मुंबईतील नाईक

गणेश नाईक म्हणजे नवी मुंबई हे समीकरण काही दशकांपूर्वी होतं. भाजपाच्या मंदा म्हात्रे यांनी 2014 साली तेंव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले गणेश नाईक यांना बेलापूरमध्ये पराभूत करत त्याला धक्का दिला. पाच वर्षांनी गणेश नाईक सहकुटुंब भाजपात आले. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत ऐरोली मतदारसंघातून विजयी झाले.

Advertisement

या निवडणुकीतही गणेश नाईक ऐरोलीमधून भाजपाचे उमेदवार आहेत. तर त्यांचे पूत्र संदीप नाईक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बेलापूरमधून निवडणूक लढवणार आहेत. मुलालाही उमेदवारी देण्याची गणेश नाईक यांची मागणी भाजपानं मान्य केली नाही. त्यामुळे संदीप यांनी तुतारी हाती घेतली आहे. ते आता 10 वर्षांपूर्वी वडिलांचा पराभव करणाऱ्या मंदा म्हात्रेंचा सामना करणार आहेत. 

( नक्की वाचा : विधानसभा निवडणुकीतील शरद पवारांचे 45 शिलेदार ठरले! पाहा संपूर्ण यादी )

बुलडाणाचे शिंगणे

बारामतीचे पवार आणि नवी मुंबईतील नाईक प्रमाणेच बुलडाणा जिल्ह्यातील शिंगणे कुटुंबीयातही या निवडणुकीत फूट पडली आहे. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना सिंदखेड राजा मतदारसंघातून उमेदवारी देखील मिळाली आहे. 

Advertisement

राजेंद्र शिंगणे अजित पवार गटातून शरद पवार गटात जाताच त्यांच्या पुतणी गायत्री शिंगणे या अजित पवार गटात दाखल झाल्या आहेत. त्या यापूर्वी शरद पवारांच्या पक्षात होत्या.

नाशिकचे भुजबळ

उत्तर महाराष्ट्रातील भुजबळ या बड्या राजकीय कुटुंबातही या निवडणुकीत फुट पडली आहे. छगन भुजबळ येवलामधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांचे पुतणे आणि नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी नांदगावमधून तिकीट न मिळाल्यानं बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. 

Advertisement

सिंधुदुर्गचे राणे

नारायण राणे यांचे दोन्ही मुलं दोन वेगळ्या पक्षातून यंदा विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. नितेश राणे भाजपाकडून कणकवली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांचे मोठे भाऊ निलेश राणे कुडाळ मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार आहेत. कुडाळची जागा भाजपाला सोडण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नकार दिल्यानं निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

( नक्की वाचा : वडिलांच्या पराभवाचा बदला निलेश राणे घेणार? कुडाळच्या लाल मातीत होणार जोरदार संघर्ष )

गडचिरोलीचे अत्राम

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघातील लढतीकडंही संपूर्ण राज्याचं लक्ष असेल. अहेरीमध्ये अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा अत्राम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांना त्यांची मुलगी भाग्यश्री अत्राम यांचं आव्हान आहे. भाग्यश्री यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं उमेदवारी दिलीय. 

'मुलगी आणि जावायाला नदीत फेकून द्या' असं खळबळजनक वक्तव्य अत्राम यांनी यापूर्वी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये केलं होतं.

Topics mentioned in this article