राणे विरुद्ध नाईक या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक संघर्षातील नवी लढाई यंदा कुडाळ विधानसभा मतदारसंघात होणार आहे. कुडाळमध्ये शिवसेनेकडून नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे निवडणूक लढवणार आहेत. त्यांना कुडाळचे विद्यमान आमदार वैभव नाईक (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचं आव्हान आहे. गेल्या काही दशकांपासून नाईक आणि राणे यांच्यातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निलेश राणे शिवसेनेत का परतले?
2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकसंघ शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक कुडाळमधून निवडून आले. शिवसेनेत फुट पडल्यानंतर वैभव नाईक यांनी ठाकरेंची साथ दिली. या मतदारसंघावर एकनाथ शिंदे यांचा दावा होता. कुडाळची जागा भाजपाला मिळावी हा प्रयत्न नारायण राणे यांनी केला. निलेश राणे यांनी तशी तयारीही सुरु केली.
निलेश राणे यांचा राजकीय प्रवास
निलेश राणे हे नारायण राणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. ते 2009 साली सर्वप्रथम काँग्रेसच्या तिकीटावर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर 2014 मधील लोकसभा निवडणुकीत त्यांचा शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी पराभव केला. राणे यांनी 2019 मधील लोकसभा निवडणूक त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाकडून लढवली होती. त्या निवडणुकीतही ते विनायक राऊत यांच्याकडून पराभूत झाले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याशी झालेल्या वादानंतर निलेश राणे यांनी राजकारणातून सन्यास घेण्याची भाषा मध्यंतरी बोलून दाखवली होती. पण, ते आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
( नक्की वाचा : ठाकरेंचा नातेवाईक ते भाजपामधून आयात उमेदवार, शिवसेना (उबाठा) पक्षाच्या यादीची 5 वैशिष्ट्य )
राणे विरुद्ध नाईक
1980-90 च्या दशकात श्रीधर नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले काँग्रेसचे नेते होते. त्याच काळात जिल्ह्यातील शिवसेना विस्ताराची जबाबदारी नारायण राणेंवर होती. 22 जून 1990 रोजी श्रीधर नाईक यांची हत्या झाली. कोकणातील ती पहिलीच राजकीय हत्या होती. ही हत्या नारायण राणे यांनीच केली असल्याचा आरोप त्यावेळी नाईक कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणात त्यांच्यावर आरोपी म्हणून खटलाही दाखल झाला. पण, कोर्टात राणेंची निर्दोष मुक्तता झाली.
कुडाळचे आमदार वैभव नाईक यांचे श्रीधर नाईक काका होते. त्यामुळे त्यांच्यातील हा संघर्ष जुना आहे. नारायण राणे यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर वैभव नाईक शिवसेनेत दाखल झाले. 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राणेंनी वैभव नाईकचा पराभव केला. त्यानंतर 2014 मधील विधानसभा निवडणुकीत नाईक यांनी या पराभवाची परतफेड केली.
( नक्की वाचा : विधानसभा निवडणुकीत AIMIM चा भाजपाला फायदा होतो का? आकडेवारीतून समजून घ्या सत्य )
2014 मधील पराभवानंतर राणे कुटुंबातील कुणीही कुडाळची जागा लढलेली नाही. आता दहा वर्षांनी निलेश राणे धनुष्यबाणच्या चिन्हावर वैभव नाईक यांना आव्हान देणार आहेत. निलेश राणे वडिलांच्या पराभवाचा बदला घेणार की वैभव नाईक विजयाची हॅटट्रिक करणार हे 23 तारखेला स्पष्ट होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world