Maharashtra Assembly Elections 2024: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विशेषत: मुंबईमध्ये मुस्लीम मतदारांचा (Muslim Voters) मोठा फायदा झाला. भाजपानं त्याला व्होट जिहाद (Vote Zihad) हे नाव दिलं. पण, विधानसभा निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये मुस्लीम उमेदवारांची संख्या कमी आहे. महाविकास आघाडीला याचा फटका बसू शकतो, असा अंदाज शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्यांनं व्यक्त केला आहे. त्यामुळे मुस्लीम कार्डचा वापर करणाऱ्या पक्षानं मुस्लीम उमेदवार देण्यात कंजुसी का दाखवली? हा प्रश्न आहे.
मुस्लीम लोकसंख्या किती?
मुंबई शहरात मुस्लीम लोकसंख्या जवळपास 20 टक्के आहे. शहरातील 10 मतदारसंघात हे प्रमाण 25 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यानंतरही प्रमुख पक्षांच्या मुस्लीम उमेदवारांची यादी एक ते चार इतकीच मर्यादीत आहे. शरद पवार गटाचे नेते आणि अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष नसीम सिद्दीकी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मुस्लीम समुदायात यामुळे उदासीनतेचं वातावरण आहे. त्यामुळे मतांचं गणित बिघडू शकतं. त्याचा फटता महाविकास आघाडीला बसेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शरद पवार गटासमोर पेच
नसीम सिद्दीकी यांनी मुस्लीम समाजाच्या नाराजीचा महाविकास आघाडीला फटका बसेल हे मान्य केलं आहे. मुस्लीम समुदायात नाराजी आहे. समुदायातील उमेदवारांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं नुकसान होऊ शकतो. आता समन्वय आवश्यक आहे. त्यासाठी शरद पवारांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : विधानसभा निवडणुकीत AIMIM चा भाजपाला फायदा होतो का? आकडेवारीतून समजून घ्या सत्य )
कुणाचे किती मुस्लीम उमेदवार?
अन्य पक्षांची काय परिस्थिती?
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं वर्सोवामधून हारुन खान या एकमेव मुस्लीम उमेदवाराला मैदानात उतरवलं आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं अणुशक्ती नगरमधून फहाद अहमद यांना उमेदवारी दिलीय. त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या आणि नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांच्याशी होणार आहे.
मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून अजित पवार यांच्या पक्षाकडून नवाब मलिक यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांचा सामना समाजवादी पक्षाचे विद्यमान आमदार अबू आझमी यांच्याबरोबर आहे. काँग्रेससोडून पक्षात आलेल्या झिशान सिद्दीकी यांना अजित पवार यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी दिलीय. या पद्धतीनं अजित पवार यांच्या पक्षानं एकूण 3 मुस्लीम उमेदवारांना संधी दिली आहे.
उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा नव्हती
लहान पक्षांपैकी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी 9 मुसलमानांना संधी दिली आहे. तर AIMIM पक्षाकडून 4 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तिकीट वाटपाची प्रकीया आणि उमेदवारांच्या निवडीवर मुस्लीम कार्यकर्ते झायद खान यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असं त्यांनी सांगितलं. आमच्याकडून मतं घ्या, पण आम्हाला प्रतिनिधित्व देण्याची उमेदवारी देण्याची वेळ येईल तेव्हा संधी देऊ नका, ही फसवणूक आहे, या शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.
( नक्की वाचा : लोकसभेत मुस्लिमांची मतं घेतली, विधानसभेत विसरली! माजी मंत्र्यांचा काँग्रेसवर मोठा आरोप )
छोट्या पक्षांना फायदा
राज्यात गेल्या दोन दशकांमध्ये विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या मुस्लीम आमदारांची संख्या एक अंकी आहे. यंदा काही मतदारसंघातील मुस्लीम मतांचा हिस्सा वंचित बहुजन आघाडी, AIMIM, राष्ट्रीय उलेमा कौन्सिल या लहान पक्षांना मिळणार आहे. राज्यातच नाही तर देशभरात मुस्लीम उमेदवारांची संख्या कमी झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
लोकसभा निवडणुकीत राज्यातील वेगवेगळ्या भागातील अल्पसंख्याक मतदार महाविकास आघाडीच्या पाठिमागे एकजूट झाला होता. भाजपानं या ध्रुवीकरणाला 'व्होट जिहाद' हे नाव ठेवलं. यंदा कमी मुस्लीम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचा परिणाम कोणत्या पक्षावर होईल हे 23 नोव्हेंबरला निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.