विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 साठी (Maharashtra Assembly Election) 15 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण 4 हजार 711 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 4 हजार 683 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते असे आयोगाने सांगितले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
493 कोटी 46 लाख रुपयांची मालमत्ता जप्त
राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत 15 ऑक्टोबरपासून आजपर्यंत एकूण 493 कोटी 46 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे अशी माहिती आयोगाने दिली आहे.
सर्वाधिक जप्ती कोणत्या भागांत?
- मुंबई- उपनगरे- 76 कोटी 10 लाख
- मुंबई शहरे- 37 कोटी 44 लाख
- नागपूर- 37 कोटी 16 लाख
- अहमदनगर- 29 कोटी 98 लाख
- पुणे- 26 कोटी 72 लाख
- रायगड- 21 कोटी 05 लाख
- धुळे -18 कोटी 65 लाख
- पालघर-18 कोटी 13 लाख
- छत्रपती संभाजीनगर (औ.बाद)- 17 कोटी 27 लाख
- ठाणे-16 कोटी 49 लाख
- सातारा- 11 कोटी 3 लाख
7 कोटी 80 लाख कुणाचे?
मीरा-भाईंदर वसई - विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत तब्बल 7 कोटी 80 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यामध्ये नालासोपारा पश्चिमेच्या बस डेपो परिसरात गुन्हे शाखा 3 च्या पथकाने ATM मध्ये पैसे भरणाऱ्या व्हॅन मध्ये 3 कोटी 48 लाख रुपये जप्त केले. दुसरीकडे मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कनेर फाटा येथे ATM व्हॅनमध्ये 2 कोटी 80 लाख रुपये आढळले. तर तिकडे मीरा रोडच्या नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 एटीएम व्हॅनमधून 1 कोटी 47 लाख रुपयांची रोकड अशी एकूण 7 कोटी 80 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम नेमकी कुणाची आणि कशासाठी आणण्यात आली होती याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.
नक्की वाचा: 'काँग्रेस, उबाठा, शरद पवारांचे पोपट', देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी
विधानसभा निवडणुकीत मतदारांना अमिष देण्यासाठी बेकायदेशीरित्या काळ्या पैशांची देवाण घेवाण होत असते. त्यासाठी आचारसंहितेच्या काळात रोकड बाळगण्यावर आणि रोकडीची ने-आण करण्यासाठी विशिष्ट नियमावली आखून देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तशा सूचना पोलीस आणि भरारी पथकाला देण्यात आल्या आहेत. आदर्श आचारसंहितेचं पालन व्हावं यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. मीरा, भाईंदर, वसई, विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नालासोपार्यात एटीएम व्हॅनमधून 3 कोटी 48 लाख, मांडवी पोलीस ठाणे हद्दीत एटीएम व्हॅनमधून 2 कोटी 80 लाख आणि मीरा रोडच्या नया नगरमध्ये दोन एटीएम व्हॅनमधून 1 कोटी 47 लाख रुपयांची रोकड अशी एकूण 7 कोटी 80 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. कुठल्याही कागदपत्रांशिवाय ही रोकड बाळगण्यात आली होती. ही रोकड जप्त करून त्याची माहिती आयकर विभागाला देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.