Mira-Bhayandar Municipal Corporation Election : मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीची तारीख जवळ येत असतानाच शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना–भाजप युती फिस्कटल्यानंतर आता भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि शिवसेना नेते, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात थेट आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी सुरू झाली आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर 'भूमाफिया आणि भ्रष्टाचाराचा महामेरू' असल्याचे गंभीर आरोप करत एकमेकांची उणी-धुणी काढली आहेत.
मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रताप सरनाईक यांनी नरेंद्र मेहता यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मेहता हे मीरा-भाईंदरमधील सर्वात मोठे भूमाफिया असून ते भ्रष्टाचाराचा महामेरू आहेत, असा आरोप त्यांनी केला. मेहता यांच्यावर फसवणूक, लाचखोरी, दमदाटी, बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे मेहता यांचे एफिडेविट दाखवत सरनाईक यांनी केला. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी नरेंद्र मेहता यांचा उल्लेख ‘भूमाफिया' म्हणून केलेले पत्र पत्रकार परिषदेत दाखवत, जून महिन्यात मुद्रांक शुल्क वसुलीसाठी मेहता यांना नोटीस पाठवण्यात आल्याचे सरनाईक यांनी सांगितले. भाजपने गुन्हेगार पार्श्वभूमीच्या उमेदवारांना तिकीट दिल्याचाही आरोप त्यांनी केला.
युती न झाल्याचा उल्लेख करत सरनाईक म्हणाले, “मीरा-भाईंदरमध्ये युती झाली नाही, ते एका अर्थाने बरंच झालं. येथील भाजप म्हणजे नरेंद्र मेहतांची ‘सेव्हन इलेव्हन' कंपनी आहे. मेहणी महापौर असताना पालिकेत प्रचंड भ्रष्टाचार झाला.” आपल्या आक्रमक भूमिकेचा इशारा देत ते म्हणाले, “मला भाईजान म्हणत माझ्या शेपटीला आग लावली आहे, आता मी रावणाची लंका जाळल्याशिवाय राहणार नाही. १५ तारखेनंतर मुख्यमंत्र्यांकडे मेहतांच्या भ्रष्टाचाराची सविस्तर तक्रार करणार.” असेही ते म्हणाले.
'प्रताप सरनाईक हेच खरे सर्वात मोठे भूमाफिया आणि भ्रष्टाचाराचा महामेरू'- नरेंद्र मेहता
दरम्यान, नरेंद्र मेहता यांनीही सरनाईक यांच्या आरोपांना तितक्याच आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले. “दोन दिवसांपूर्वी मला भेटायला आले तेव्हा मी संत होतो का?” असा सवाल करत, ईडी मागे लागल्यानंतरच सरनाईक यांना भाजपची आठवण आली, असा टोला त्यांनी लगावला. मेहता यांनी पलटवार करत, “प्रताप सरनाईक हेच खरे सर्वात मोठे भूमाफिया आणि भ्रष्टाचाराचा महामेरू आहेत. मीरा-भाईंदरमध्ये तब्बल ८० कोटी रुपयांची शासकीय जमीन अवघ्या ३ कोटी रुपयांत त्यांनी हडप केली. नागरीकांसाठी राखीव जागेत स्वतःचे दुकान थाटले,” असा आरोप मेहता यांनी केला.
युतीचा प्रस्ताव आपले कारनामे लपवण्यासाठीच आणण्यात आल्याचा दावा करत मेहता म्हणाले, “सरनाईक मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार म्हणतात, पण ईडी कार्यालयात त्यांची ये-जा सुरू आहे. निवडणुकीनंतर कशाला, आताच तक्रार का करत नाहीत?” असा सवाल मेहता यांनी केला आहे. शेवटी त्यांनी, “देवाने सरनाईकांना सद्बुद्धी द्यावी,” अशी उपरोधिक प्रार्थनाही केली. सरनाईक यांना ‘मीपणा' असून ते घमंडी असल्याची टीकाही त्यांनी केली. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर दोन दिग्गज नेत्यांमधील हा संघर्ष अधिकच चिघळण्याची चिन्हे असून, येत्या दिवसांत मीरा-भाईंदरचे राजकारण आणखी तापणार हे मात्र निश्चित आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
