महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला राज्यात बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मात्र मनसेच्या नेत्यांनी आता महायुतीच्या काही नेत्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. तसेच या उमेदवारांचा प्रचार करणार नसल्याचंही म्हटलं आहे.
नक्की वाचा - 'फडणवीसांना अटकेची भीती तर शिंदेंना...' राऊतांचा 'त्या' आरोपावर मोठा गौप्यस्फोट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी संजय निरुपम आणि रविंद्र वायकर सारख्या उमेदवारांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच राज ठाकरे यांनी केवळ देशाला सक्षम नेतृत्व मिळावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केल्याचंही स्पष्ट केलं आहे.
शालिनी ठाकरे यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलंय?
शालिनी ठाकरे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, मनसेला 'धनुष्यबाण' चिन्हावर लढायला सांगणार्यांवर दुसर्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. इकडून तिकडून पालापाचोळ्यासारखा उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रविंद्र वायकर सारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठिंबा गृहीत धरू नये.
नक्की वाचा - भाजपने निवडणुकीपूर्वीच खातं उघडलं; गुजरातमध्ये बिनविरोध पहिला खासदार
काय म्हणाले होते राज ठाकरे?
देशाला आज खंबीर नेतृत्वाची गरज आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणतीही अपेक्षा नाहीत. परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी मी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून केली होती.