खासदार संजय राऊत यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एक मुलाकत दिली होती. त्यात त्यांनी अनेक खुलासे करताना उद्धव ठाकरे सरकारवर मोठे आरोप केले होते. त्यावेळच्या ठाकरे सरकारने फडणवीसांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची तयारी चालवली होती असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. त्याला आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत वातावरण आणखी तापवले आहे.
हेही वाचा - 1 लाख शेतकरी घेऊन बच्चू कडू जिल्हाधिकारी कार्यालयात घुसणार? कारण काय?
'फडणवीसांना अटकेची भीती म्हणून...'
देवेंद्र फडणवीसांवर फोन टॅपिंगचा आरोप होता. त्यांनी विरोधकांचे फोन अत्यंत बेकायदेशीरपणे टॅप केले होते. विरोधकांवर पाळत ठेवण्याचे काम त्यांनी केले होते. फडणवीसांच्याच आदेशाने रश्मी शुक्ला यांनी हे कृत्य केले. त्यांचीही चौकशी सुरू होती. त्याच वेळी आपल्याला अटक होऊ शकते याची भीती फडणवीसांना होती. त्यातून ते तडतड करत होते असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.
'एकनाथ शिंदेंनाही होणार होती अटक'
एककडे फडणवीसांना अटकेची भीती सतावत होती. त्यामुळे ते अस्वस्थ होते. त्यातूनच त्यांनी एकनाथ शिंदेंवर दबाव आणला. एकनाथ शिंदेंनाही अटकेची भीती दाखवली. एकनाथ शिंदे यांनी सांगावं त्यांना मोदी सरकार का अटक करणार होतो असा सवाल करत राऊत यांनी खळबळ उडवून दिल आहे. शिंदे यांनी आपली अटक टळावी यासाठी 40 आमदार घेवून बाहेर पडले असेही राऊत म्हणाले.
महाजन, शेलार, दरेकर, लाड यांचाही उल्लेख
दरम्यान राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यासह आशिष शेलार यांचाही उल्लेख केला. महाजन,शेलार,दरेकर, लाड यांच्यावर अटक होण्यासारखे गुन्हे होते. त्यांची जर चौकशी होणार होती तर त्यामुळे तिळपापड होण्याची गरज काय? कायदा सर्वांसाठी सारखा आहे. त्यांनी गुन्हा केला असेल तर कायदा आपले काम करणार असेही राऊत म्हणाले. शिवाय ते कायद्याच्या वर आहेत का असा प्रश्नही राऊत यांनी या निमित्ताने केला. या देशात प्रधानमंत्री यांच्यावर कारवाई झाली आहे. राज्यपाल यांच्यावर देखील कारवाई झाली आहे. विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना मोदी सरकारने अटक केली आहे. अनेक मंत्री आमदार खासदार यांना महाराष्ट्रात आणि देशभरात अटक झाली आहे असेही राऊत म्हणाले.
काय म्हणाले होते एकनाथ शिंदे
ठाकरे सरकारमध्ये भाजपच्या प्रमुख नेत्यांना अटक करण्याचा डाव रचला गेला होता असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला होता. शिवाय आपल्याला मंत्री असूनही काम करू दिले जात नव्हते. आदित्य ठाकरे हे आपल्या खात्याच्या बैठका घेत होते असा आरोपही त्यांनी केला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world