महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवतीर्थ येथे ही बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर यावर नेत्यांमध्ये चर्चा घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. या बैठकीला मनसेचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. आगामी काळात मनसे नेमकी काय राजकीय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नक्की वाचा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेते पदी निवड
मनसेचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. भाजपकडून माहीममध्ये अपेक्षित मदत झाली नाही. त्यामुळे अमित ठाकरे यांचा पराभव झाला. मनसेच्या सर्वच उमेदवारांना कमी झालेलं मतदान त्यामुळे पक्ष चिन्ह आणि मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेची आजची बैठक महत्त्वाची असणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेत्यांची सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे. संजय राऊत यांनी मराठी आणि महाराष्ट्र हिताच्या पक्षांनी एकत्र येण्याबाबत विचार करावा या केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे का? याबाबत ही चर्चा होण्याची शक्यता आहे.
२०१९ला लाव रे तो व्हिडीओ म्हणत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बाजूनं असलेल्या राज ठाकरेंनी २०२४ मध्ये भाजप आणि शिंदे सेनेशी जवळीक साधली. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. सातत्यानं भूमिका बदलणं, धरसोड वृत्ती आणि लोकांचे प्रश्न मांडण्यात नसलेलं सातत्य यामुळे मनसेला अपयश आल्याची चर्चा आहे. राज ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसला तो माहीम मतदारसंघात. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या अमित ठाकरेंसाठी मनसेनं योग्य गृहपाठ केला नव्हता का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दादर-माहीम मतदारसंघात ठाकरे गटाच्या महेश सावंतांचा विजय झाला. 18व्या फेरीअखेर ठाकरे गटाच्या महेश सावंत यांना 46 हजार 579 मतं मिळाली.दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या शिंदे गटाच्या असलेल्या परंतू अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या सदा सरवणकरांना 45 हजार 239 मतं मिळाली. तर 30 हजार 703 मतांसह अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. दादर-माहीममधली एकगठ्ठा मुस्लीम मतं ठाकरेंना मिळणार आणि मराठी मतांमध्ये शिंदे गट, ठाकरे गट आणि मनसे अशी विभागणी होणार होती. या मतविभाजनाचा फटका मनसेला बसला आणि अमित ठाकरे पहिलीच निवडणूक हरले.
नक्की वाचा - विधानसभा निवडणुकीत पराभव का झाला? शरद पवारांनी सांगितली 3 कारणं
शिंदे गटाच्या सदा सरवणकरांबरोबर राज ठाकरेंचं शेवटपर्यंत बोलणं झालं नाही. अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या क्षणी भेटायला गेलेल्या सरवणकरांना राज ठाकरेंची भेट नाकारली होती. दुसरीकडे २०१९ मध्ये आदित्य ठाकरे वरळीतून लढले तेव्हा राज ठाकरेंनी उमेदवार दिला नव्हता. मात्र अमित ठाकरेंच्या बाबतीत काकांनी मदत केली नाही. अमित ठाकरेंच्या पराभवामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं वितुष्ट वाढण्याची शक्यता आहे.
२००९ साली १३ आमदार निवडून आल्यानंतर राज ठाकरेंनी राजकीय पक्षांची झोप उडवली होती. त्यानंतरही २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत मनसेचा एकही आमदार निवडून आला होता. आता एकही आमदार निवडून न आल्यानं मनसे पक्ष आणि इंजिन चिन्ह धोक्यात आलं आहे.
राज ठाकरेंचं इंजिन धोक्यात?
कुठल्याही पक्षाला त्याची मान्यता टिकवून ठेवण्यासाठी निवडणुकीत ८ टक्के मतदान किंवा १ आमदार ६ टक्के मतदान किंवा २ आमदार ३ टक्के मतदान किंवा ३ आमदार गरजेचे असतात. मात्र मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही आणि मनसेचा व्होट शेअर १.५५ टक्के आहे. त्यामुळे मनसेचं इंजिन चिन्ह जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता प्रश्न हा, की मनसे पुढे काय करणार. पुढच्या काही महिन्यांत महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागतील त्यावेळी मनसेची भूमिका काय असेल असा सवाल उपस्थित केला जात आहे.