मुंबईतील काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांची काँग्रेकडून मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी नसीम खान यांना दुरध्वनी करुन त्यांच्याशी चर्चा केलीय. नसीम खान यांना हायकमांडकडून यावेळी खास आश्वासन मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खान यांना राज्यसभा किंवा विधानसभेत पुनर्वसन करण्याचं आश्वासन हायकमांडनं दिलं आहे, अशी माहिती आहे.
का आहेत खान नाराज?
उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी खान इच्छूक होते. पण, काँग्रेसनं तिथून मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे खान नाराज आहेत. त्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केलीय. त्याचबरोबर त्यांनी पक्षाच्या स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला होता.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काँग्रेसला मुस्लिमांची मतं हवी आहेत. मुस्लीम उमेदवार का नको?' असं सर्व पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मला विचारत आहेत. 'मी याच कारणांमुळे मुसलमानांना सामोरं जाऊ शकत नाही. माझ्याकडं या प्रश्नाचं उत्तर नाही, असं पत्र नसीम खान यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना लिहलं होतं. त्यानंतर खर्गे यांनी नसीम खान यांना फोन करत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय.
( नक्की वाचा : काँग्रेसला मुस्लीम मतं हवीत, उमेदवार नको ! माजी मंत्र्यांनी दिला घरचा आहेर )
दरम्यान, AIMIM पक्षाचे नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी नसीम खान यांना मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. 'NDTV मराठी' शी बोलताना जलील यांनी ही ऑफर दिलीय. त्याचबरोबर त्यांच्यावर निशाणा देखील साधला आहे. 'काँग्रेस किंवा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकाही मुस्लिमाला तिकीट देणार नाही हे आम्हाला माहिती होतं. आता पक्षानं तिकीट नाकारल्यानंतर नसीम खान यांनी स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिलाय. तुम्हाला इतका राग आला असेल तर तुम्ही पक्ष सोडायला हवा होता असा टोला जलील यांनी यावेळी खान यांना लगावला होता.