जाहिरात
Story ProgressBack

खरे हिंदू कोण?, शांतीगिरी महाराजांच्या भूमिकेनं महायुतीला घाम

Nashik Lok Sabha Election : शांतिगिरी महाराज यांनी अर्ज मागं न घेतल्यानं महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.

Read Time: 2 min
खरे हिंदू कोण?, शांतीगिरी महाराजांच्या भूमिकेनं महायुतीला घाम
Shantigiri Maharaj शांतीगिरी महाराजांनी महायुतीची डोकेदुखी वाढवली आहे.
नाशिक:

किशोर बेलसरे, प्रतिनिधी

Nashik Lok Sabha Election :  नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचं अंतिम चित्र आता स्पष्ट झालं आहे.  नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी (6 मे) अखेरचा दिवस होता. अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी अर्ज मागं न घेतल्यानं महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. महायुतीकडून शिवसेनेचे हेमंत गोडसे ही निवडणूक लढवत आहेत. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राजाभाऊ वाजे रिंगणात आहेत. आता शांतीगिरी महाराजही निवडणूक रिंगणात असल्यानं नाशिकमध्ये तिरंगी लढत होणार आहे. शांतीगिरी महाराजांना या निवडणुकीसाठी बादली हे चिन्ह मिळालं आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

खरे हिंदू कोण ?

शांतीगिरी महाराजांनी 'NDTV मराठी' सोबत विशेष बातचित केली. त्यामध्ये त्यांनी आपण 'जय बाबाजी' परिवाराच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं सांगितलं. शांतीगिरी महाराजांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी महायुतीच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाराजांची भेट घेऊन त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला यश आलं नाही.

'बाबांच्या दरबारात अनेक मंडळी येतात, चर्चा होते पण आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत,' असं त्यांनी सांगितलं. शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीमुळं हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडेल असा आरोप होतोय त्यावर खरे हिंदू कोण हे पाहायला मिळेल, असं महाराजांनी स्पष्ट केलं. आमचा लढा हा राष्ट्रहितासाठी असून नाशिकचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

( नक्की वाचा : सातारा लोकसभा निवडणूक : पवारांवरील निष्ठा की राजेंचा मान? चुरशीच्या लढतीकडं राज्याचं लक्ष )
 

शांतीगिरी महाराजांना बादली हे चिन्ह मिळालंय. त्याबाबतही महाराजांनी विश्लेषण केलं. बादलीमध्ये अनेक प्रकारचे वस्तू घेऊ शकतो. त्याचे अनेक उपयोग होऊ शकतात. बादलीरुप कुंभ मतदारांनी भरुन द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. हा बाबा पैसे मिळवण्यासाठी निवडणूक लढवणार नाही, असा नाशिककरांना विश्वास असल्याचा दावा महाराजांनी व्यक्त केला. 

कोण आहेत शांतीगिरी महाराज?

सोमेश शांतिगिरी महाराज हे श्री जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी आहेत. त्यांना मानणारा मोठा समाज नाशिक जिल्ह्यात आहे. त्याच आधारावर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. देव, देश आणि धर्मासाठी निवडणूक लढवण्याचा संकल्प त्यांनी यापूर्वीच जाहीर केला आहे. त्यांनी यापूर्वी एखाद्या पक्षाची उमेदवारी मिळणार का? याची चाचपणी देखील केली होती. पण, तसं न झाल्यानं त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination