- नाशिकमध्ये भाजपने विरोधी पक्षांतील पाच मोठ्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला
- आमदार देवयानी फरांदे यांनी नवीन नेत्यांच्या प्रवेशाला विरोध दर्शवला आहे.
- विरोधी पक्षांतील दिग्गज नेते भाजपात प्रवेश करणार असल्याने देवयानी फरांदे नाराज
राहुल वाघ
राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांची चाहूल लागताच राजकीय पक्षांतरांना वेग आला आहे. नाशिकमध्ये भाजपने मोठं ‘इनकमिंग' करत विरोधी पक्षांतील पाच बड्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. मात्र या प्रवेश सोहळ्यावरून नाशिक भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. भाजपच्या नाशिक महानगरपालिका निवडणूक प्रमुख आणि आमदार देवयानी फरांदे यांच्या तीव्र विरोधाकडे दुर्लक्ष करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. फरांदे या प्रवेश सोहळ्याला अनुपस्थित राहिल्याने त्यांची नाराजी उघडपणे समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण तर आलेच आहे, पण नाशिक भाजपमध्ये चाललंय तरी काय असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उबाठा शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर व उबाठा नेते यतिन वाघ, काँग्रेस नेते शाहू खैरे, मनसेचे माजी आमदार नितीन भोसले तसेच मनसेचे स्थानिक नेते दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या दिग्गज नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढेल, असा दावा केला जात असला तरी स्थानिक पातळीवर असंतोषाचे वातावरणही स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेषतः यतिन वाघ आणि दिनकर पाटील यांच्या प्रवेशाला आमदार देवयानी फरांदे यांनी तीव्र विरोध केला होता. या संदर्भात आपल्याशी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही, असे फरांदे यांचे म्हणणे आहे.
विनायक पांडे आणि यतिन वाघ यांच्यासारख्या नेत्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक कार्यकर्त्यांच्या संधी मर्यादित होतील, अशी आमदार फरांदे यांची भूमिका आहे. यावेळी त्यांना त्यांचे आश्रू अनावर झाले होते. ते कॅमेऱ्यासमोर अक्षरश: रडल्या. आपणही एक सामान्य कार्यकर्ता आहोत. आपणही नगरसेवक ते आमदार असा प्रवास केला आहे. संघर्ष केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्याचे कष्ट काय असतात ते आपल्याला माहीत आहे. आपल्या डोळ्या समोर कार्यकर्त्याचा बळी दिला जात असेल तर ते योग्य नाही असं ही त्या म्हणाल्या. आज जे घडलं ते मला आवडलेलं नाही. मला कोंडीत पकडायचे असेल तर पकडा मी घाबरत नाही. या सगळ्या विषयांच्या माध्यमातून जुन्या नेत्यांनी उभे राहिले असते तर कार्यकर्त्यांना वेगळा संदेश गेला असते असं ही त्या म्हणाल्या. हे बोलत असताना त्यांनी आश्रूंना वाट करून दिली.
या पार्श्वभूमीवर प्रवेश सोहळ्यापूर्वी भाजप कार्यालयाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अनेक कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर घोषणाबाजी करत आपली नाराजी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले की, अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची नाराजी स्वाभाविक आहे. मात्र पक्ष विस्तारासाठी अशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. देवयानी फरांदे यांचा विरोध लवकरच संपेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपण त्यांची समजूत काढू असं ही त्यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच भाजपमध्ये प्रवेश म्हणजे तिकीट मिळेलच असे नाही, हेही महाजन यांनी स्पष्ट केले. सर्वांच्या कामगिरीचा आढावा घेतल्यानंतरच उमेदवार निश्चित केले जातील, असे त्यांनी सांगितले. मुंबईत ठाकरे बंधूंची वाढती जवळीक आणि पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकजुटीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपने विरोधकांच्या गडाला धक्का देण्याची रणनीती आखल्याचे दिसत आहे. मात्र नव्या नेत्यांच्या प्रवेशामुळे जुने कार्यकर्ते नाराज राहिल्यास, आगामी निवडणुकांमध्ये भाजपला अंतर्गत बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दिनकर पाटील हे मनसेचे बडे नेते मानले जातात. त्यांनी काल ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर पेढे वाटले होते. शिवाय संगीताच्या तालावर ठेकाही धरला होता. त्याला काही तास होत नाही तोच त्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यांनी भाजपची साथ देण्याचे ठरवले आहे. ते मनसेचे प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या मुलाखती देखील त्यांनी घेतल्या होत्या. सातपूर परिसरात दिनकर पाटील यांचे चांगले वर्चस्व असून यंदा दिनकर पाटील त्यांची पत्नी आणि मुलगा ही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. महानुभाव पंथाचा देखील पाटील यांना नेहमीच पाठिंबा मिळत असतो. प्रवेश केलेले दुसरे नेते विनायक पांडे हे 2006-2009 या काळात ठाकरेंच्या शिवसेनेचे महापौर होते. नाशिक मधील एक आक्रमक नेता म्हणून विनायक पांडे यांची ओळख होती, तर यतीन वाघ हे मनसेचे 40 नगरसेवक निवडून आले होते त्यावेळी पहिले महापौर झाले होते.