BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून तिकीट वाटपावरून आता घराणेशाहीची चर्चा रंगू लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या मुला-मुलींसाठी किंवा नातेवाईकांसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.
एकीकडे भाजपकडून ठाकरेंवर घराणेशाहीचा आरोप होत असताना, संजय राऊत यांनी मात्र भाजपमध्येच सर्वात जास्त घराणेशाही असल्याचा प्रतिवार केला आहे. महापालिकेवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी ठाकरेंनी नवी रणनीती आखली असली, तरी नेत्यांच्या या 'लगीनघाई'मुळे पक्षात कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घराणेशाहीची नवी समीकरणं
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक बड्या नेत्यांनी आपल्या वारसांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी लॉबिंग सुरू केलं आहे. दहिसरमधून विनोद घोसाळकर आपल्या धाकट्या सूनेसाठी, पूजा घोसाळकर यांच्यासाठी इच्छुक आहेत. विशेष म्हणजे त्यांची मोठी सून तेजस्विनी घोसाळकर यांनी नुकताच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
(नक्की वाचा : 'त्या' एका वाक्याने इतिहास घडला! राज ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितली उद्धव ठाकरेंच्या युतीची Inside Story )
याशिवाय खासदार संजय पाटील आपल्या मुलीसाठी, राजोल पाटील यांच्यासाठी भांडुपमधून तिकीट मागत आहेत. सुनील प्रभू यांना आपला मुलगा अंकित प्रभू याला गोरेगावातून निवडणूक लढवायची आहे. या नेत्यांचा दावा आहे की, त्यांची मुलं केवळ नेत्यांची मुलं नसून ती अनेक वर्षांपासून पक्षात सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत.
नेत्यांच्या मुला-मुलींसाठी तिकीटाची मागणी
केवळ हेच नेते नाहीत, तर ठाकरेंच्या शिवसेनेतील इतरही अनेक ज्येष्ठ मंडळी आपल्या नातेवाईकांसाठी आग्रही आहेत. आमदार अजय चौधरी आपल्या सूनेसाठी परळमधून, तर आमदार सुनील शिंदे यांचा भाऊ प्रभादेवी मतदारसंघातून नशीब आजमावण्यासाठी इच्छुक आहे.
माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी वडाळ्यातून आपल्या मुलासाठी तिकीट मागितलं आहे. लालबागमध्ये दगडू सकपाळ आपल्या मुलीसाठी, तर कुलाब्यात अशोक धात्रक यांचा मुलगा अजिंक्य धात्रक निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. कोकणातील नेते विनायक राऊत सुद्धा आपल्या मुलाला किंवा मुलीला वाकोल्यातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत.
( नक्की वाचा : Raj-Uddhav Thackeray Alliance : ठाकरेंच्या युतीवर मोहर, पण.. 'या' कारणांमुळे कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली )
ठाकरेंची नवी रणनीती
मुंबई महापालिकेत सध्या ठाकरेंच्या शिवसेनेची परिस्थिती पाहता, त्यांना नव्या दमाच्या उमेदवारांची गरज आहे. 2017 मध्ये शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले होते, पण पक्षफुटीनंतर सध्या ठाकरेंकडे केवळ 48 नगरसेवक उरले आहेत. त्यातील 35 नगरसेवक त्यांच्याशी एकनिष्ठ आहेत.
यंदाच्या निवडणुकीत ठाकरे 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्याऐवजी त्यांच्या पसंतीचा तरुण चेहरा देण्याचा विचार करत आहेत. तरुण स्थानिक शाखाप्रमुख आणि महिला संघटकांना उमेदवारी देऊन प्रत्यक्ष फिल्डवर पक्षाची ताकद वाढवण्याची ठाकरेंची योजना आहे.
संजय राऊत यांचा भाजपवर पलटवार
घराणेशाहीच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत यांनी स्पष्ट केलं की, जे नेते आपल्या मुला-मुलींसाठी तिकीट मागत आहेत, ते सर्व कार्यकर्ते म्हणून अनेक वर्ष जमिनीवर काम करत आहेत. सुनील प्रभू यांचा मुलगा अंकित प्रभू किंवा संजय पाटील यांची कन्या राजोल पाटील हे युवा सेनेत सक्रिय आहेत.
सर्वच पक्षांमध्ये अशा प्रकारे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाते, असं समर्थन राऊत यांनी केलं आहे. तसेच त्यांनी भाजपवर टीका करताना म्हटलं की, घराणेशाही नेमकी कुठे आहे हे पाहायचं असेल तर भारतीय जनता पक्षाकडे पाहावं.
( नक्की वाचा : Raj-Uddhav Thackeray Alliance : ठाकरे बंधू एकत्र, पण काँग्रेसचे स्वबळ महायुतीच्या पथ्यावर ! )
कुणाला संधी मिळणार?
मुंबई महापालिकेची निवडणूक तब्बल 8 वर्षांनंतर होत असल्याने यावेळी चुरस अधिक वाढली आहे. शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंची ताकद प्रत्यक्ष मैदानात काहीशी कमी झाल्याचं बोललं जातंय. अशा परिस्थितीत घराणेशाहीला महत्त्व द्यायचं की निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी द्यायची, असा पेच ठाकरेंसमोर असणार आहे.
ठाकरे आणि मनसेचे उमेदवार शेवटच्या टप्प्यात अर्ज भरणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या राजकीय रस्सीखेचमध्ये कोणाचं पारडं जड ठरणार आणि ठाकरे कोणावर विश्वास दाखवणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world