नझीर खान, प्रतिनिधी
ZP Election 2026 : परभणी जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एकाच कुटुंबाची मोठी चर्चा रंगली आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील तब्बल 5 सदस्य जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशीब आजमावत आहेत.
विशेष म्हणजे हे सदस्य केवळ भाजपमधूनच नाही, तर वेगवेगळ्या पक्षांतून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. वारंवार घराणेशाहीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करणाऱ्या भाजपासाठी आता हीच घराणेशाही डोकेदुखी ठरताना दिसत आहे. एकाच घरातील इतक्या जणांना उमेदवारी मिळाल्याने विरोधकांकडून आता भाजपला लक्ष्य केले जात आहे.
एकाच घरात 5 उमेदवार
वरपुडकर कुटुंबातील सदस्यांनी परभणीतील वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटांतून आपली दावेदारी सादर केली आहे. सुरेश वरपुडकर यांचा मुलगा समशेर वरपुडकर हे शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या सून प्रेरणा वरपुडकर यांना भाजपने दैठणा गटातून उमेदवारी दिली आहे.
इतकेच नाही तर त्यांचे पुतणे बोनी वरपुडकर हे लोहगाव गटातून भाजपाचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. एकाच पक्षाकडून घरातील तीन जणांना संधी मिळाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
( नक्की वाचा : ZP Election 2026: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा, वाचा A to Z माहिती एका क्लिकवर )
पक्षांच्या सीमा ओलांडून वरपुडकरांची घराणेशाही
वरपूडकरांचा कुटुंबाचा राजकीय विस्तार केवळ भाजपपुरता मर्यादित राहिलेला नाही. सुरेश वरपुडकर यांची कन्या सोनल देशमुख यांनी उबाठा गटाकडून झरी सर्कलमध्ये उमेदवारी मिळवली आहे. तर त्यांचे दुसरे पुतणे अजित वरपुडकर हे काँग्रेसच्या तिकिटावर लोहगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत.
विशेष म्हणजे लोहगाव गटात एकाच कुटुंबातील दोन पुतणे आमनेसामने ठाकले आहेत. याव्यतिरिक्त सुरेश वरपुडकर यांच्या पत्नी मीना वरपुडकर या नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
( नक्की वाचा : Raj Thackeray : 'शिसारी आलीय...'; कल्याण-डोंबिवलीतील प्रकारावर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया )
वरपुडकर कुटुंबाचे स्पष्टीकरण
एकाच कुटुंबातील सहा व्यक्ती सक्रिय राजकारणात आणि त्यातही पाच जण एकाच वेळी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने वरपुडकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्यासमोरही या घराणेशाहीच्या आरोपांना उत्तरे देताना कठीण प्रसंग ओढवला आहे.
मात्र, या आरोपांवर वरपुडकर कुटुंबाने आपली बाजू स्पष्ट केली आहे. आम्ही केवळ वरपुडकर कुटुंबातील आहोत म्हणून आम्हाला तिकीट मिळालेले नाही, तर आम्ही अनेक वर्षांपासून पक्षासाठी आणि समाजासाठी स्वतःला झोकून दिले आहे. जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष केल्यामुळेच पक्षाने आणि जनतेने आम्हाला पसंती दिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world