PCMC Election: नसबंदीच्या आरोपांनी राजकारण पेटले; अजित पवारांना उत्तर देताना लांडगेंनी काढले बारामतीचे कुत्रे

PCMC Election 2026: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आता भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins
PCMC Election 2026: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने उभे ठाकले आहेत.
पिंपरी चिंचवड:

सुरज कसबे, प्रतिनिधी

PCMC Election 2026: पिंपरी चिंचवड शहरात सध्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आता भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

पवारांच्या टीकेला उत्तर देताना लांडगे यांची जीभ घसरली असून त्यांनी थेट वैयक्तिक पातळीवर जात बोचरी टीका केली आहे. तुमच्या बारामतीत कुत्रे चावत नाहीत का आणि तिथे नसबंदी झाली नाही का, असा सवाल करत लांडगे यांनी पवारांना त्यांच्याच भाषेत सुनावले आहे.

'आधी डोक्यातील विचारांची नसबंदी करा'

पिंपरी चिंचवड महापालिकेतील कुत्र्यांच्या नसबंदीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अजित पवार यांनी एका जाहीर सभेत केला होता. या आरोपाचा समाचार घेताना महेश लांडगे प्रचंड संतापलेले पाहायला मिळाले. भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापेक्षा तुमच्या डोक्यातल्या घिसापिट्या विचारांची नसबंदी आधी करा, अशा तिखट शब्दांत त्यांनी पवारांवर हल्ला चढवला. 

ज्यांचे स्वतःचे नाव राज्यातील मोठ्या घोटाळ्यांमध्ये चर्चेत आहे आणि जमिनीच्या व्यवहारात मुलाचे नाव समोर आले आहे, अशा व्यक्तीने भ्रष्टाचारावर बोलणे हास्यास्पद असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

Advertisement

( नक्की वाचा : PCMC Election: 'फडणवीसांना आधीच सावध केलं होतं!' अजित पवारांबाबत भाजपा प्रदेशाध्यक्षाचं मोठं वक्तव्य )
 

'... इथे घंटा वाजवायला आला होता का?'

महापालिकेच्या मुदत ठेवी मोडल्याच्या आरोपावरूनही लांडगे यांनी अजित पवारांना धारेवर धरले. तुम्ही अडीच वर्षे या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहत होता, मग त्यावेळी गप्प का होता, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

त्या काळात तुम्ही इथे केवळ घंटा वाजवायला आला होता का, असा संतप्त सवाल विचारत लांडगे यांनी पवारांच्या कार्यपद्धतीवरच बोट ठेवले आहे. भ्रष्टाचार झाला होता तर तेव्हा कारवाई का केली नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

Advertisement

'शरद पवारांमुळे ओळख'

अजित पवारांच्या राजकीय कारकीर्दीवर भाष्य करताना लांडगे यांनी त्यांना शरद पवारांची आठवण करून दिली. अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये पूर्वी कोण ओळखत होते, असा सवाल करत शरद पवारांनी त्यांना खासदार करून मोठे केले, हे त्यांनी विसरू नये असे लांडगे म्हणाले. 

या शहराचे मालक बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा लोकसेवक म्हणून राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला. केवळ खोटे आरोप करून हे लोक सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतात, मात्र यावेळी त्यांना 120 जागांवर उमेदवारही मिळाले नाहीत, यातूनच जनतेची त्यांच्याबद्दलची नाराजी स्पष्ट होते, असा दावा लांडगे यांनी केला.

Advertisement

( नक्की वाचा : अकोटचा AIMIM बरोबरचा'अनाकलनीय' प्रयोग भाजपाला झोंबला; 'त्या' आमदारावर होणार मोठी कारवाई! )
 

'आरोप सिद्ध करून दाखवू का?'

आम्हाला कोणत्याही मोठ्या नेत्याला विनाकारण बदनाम करायचे नाही, म्हणूनच आम्ही आतापर्यंत शांत आहोत. मात्र जर तुम्ही आमच्यावर खोटे आरोप करत राहिलात, तर तुमच्यावरचे सर्व आरोप आम्ही सिद्ध करून दाखवू का, असा थेट इशाराच पैलवान महेश लांडगे यांनी दिला आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर दोन मोठ्या नेत्यांमधील हा कलगीतुरा आता शहरभर चर्चेचा विषय ठरत असून याचे पडसाद मतदानावर उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 

Topics mentioned in this article